रश्मी शुक्ला अखेर पोलिस महासंचालक

0

(Mumbai)मुंबई : आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मागील आठवडाभरापासूनच त्यांच्या नियुक्तीची चर्चा सुरु होती. अखेर राज्य शासनाने आज नियुक्तीची प्रक्रिया पार पडली. संभाव्य पोलीस महासंचालकपदाच्या सेवाज्येष्ठतेच्या यादीत (Rashmi Shukla)रश्मी शुक्ला यांचे नाव अग्रस्थानी होते. राज्यात गाजलेल्या फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला या वादग्रस्त ठरल्या होत्या.

रश्मी शुक्ला या राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक असणार आहेत. महासंचालक पदासाठी तीन अधिकाऱ्यांच्या नावांची यादी होती.यामध्ये सर्वात आधी नाव रश्मी शुक्ला यांचे नाव होते. त्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना निर्णय घ्यायचा होता. अखेर आज शासनाने शुक्ला यांच्या नियुक्तीचा आदेश जारी केला. रश्मी शुक्ला यांना ६ महिन्यांचा कार्यकाळ मिळणार आहे. रश्मी शुक्ला या १९८८ च्या बॅचच्या आयपीएस आहेत. त्यांनी नागपूर ग्रामीण पोलिस अधीक्षक व नागपुरात पोलिस उपायुक्त म्हणूनही काम केले आहे.

त्या गुप्तचर विभागाच्या आयुक्त असताना फोन टॅपिंग प्रकरण घडले होते.त्यावेळी त्यांनी संजय राऊत, नाना पटोले यांच्यासह महाविकास आघाडीमधील महत्त्वाच्या नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप होता. महाविकास आघाडी सरकारने यासंदर्भात गुन्हे दाखल करुन चौकशी सुरु केली होती. त्यानंतर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारमध्ये रश्मी शुक्ला यांना क्लिनचिट मिळाली.