


शेगाव(Shegaon) येथील श्रीसंत गजानन महाराज यांनी विस्तवाविना पेटवून दाखवल्याचे सांगितले जाणारी दुर्मीळ चिलीम आकोट येथील यात्रा चौकातील रहिवासी नंदकिशोर वडाळकर यांनी श्रद्धापूर्वक जपून ठेवल्याची माहिती मिळाली आहे. संत गजानन महाराज हे सन १९०९ मध्ये आकोट तालुक्यातील मुंडगाव येथे झ्यामसिंह राजपूत यांच्या घरी थांबले होते. तेव्हा महाराजांच्या सेवेत तल्लीन झालेल्या सेवेकरी भक्त विष्णुपंत गोविंद पाठक (मुंडगाव) यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन महाराजांनी प्रसादाच्या रूपात आपली चिलीम भेट दिली, असे ग्रंथात म्हटले आहे. ही चिलीम पाठक यांनी आपला देह सोडण्यापूर्वी आपले विश्वासू सहकारी त्र्यंबकराव वडाळकर यांना देखभाल करण्यासाठी भेटस्वरूपात १९७८ मध्ये सोपविली होती. ही चिलीम साडेसहा इंच लांब असून त्यावर अष्टधातूचे वेष्टण आहे. बारीक रंगीत तारेचे सुंदर नक्षीकामसुद्धा केले असल्याचे चिलीम सांभाळणारे नंदकिशोर वडाळकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. त्यांच्या घरामध्ये ही चिलीम तसेच त्यावेळी मुंडगाव गजानन महाराजांचे सेवेकरी असल्याचा चांदीचा बिल्ला तसेच त्र्यंबकराव वडाळकर यांची आई कृष्णामाई यांनी श्रींना चरणस्पर्श करून घेतलेल्या चांदीच्या लहान पादुका एका काचेच्या पेटीमध्ये जतन करून ठेवल्या आहेत. विशेष म्हणजे या चिलीमचा फोटोसह संदर्भ ‘दास भार्गव’ यांनी श्री गजानन महाराज चरित्रकोशामध्ये संशोधन व लेखन करताना ही चिलीम त्र्यंबकराव वडाळकर यांच्याकडे असल्याचा पान क्र. १५ वर उल्लेख केला असल्याची माहिती देण्यात आली. श्रींची दुर्मीळ चिलीम घरात आल्याने वडाळकर कुटुंबाने ती जीवापाड जपली आहे. दर गुरुवारी या चिलीमची पूजाअर्चा, अभिषेक करण्यात येतो.
🙏गण गण गणात बोते🙏