बंग यांनी महिला सरपंचांचा घडविला जबरदस्तीने पक्षप्रवेश

0

पत्रपरिषदेत आ. समीर मेघे यांनी केली स्पष्टोक्ती

हिंगणा(Hingna) – प्रतिस्पर्धी उमेदवाराने जबरदस्तीने मांडव घोराड येथील भाजप समर्थित गटग्रामपंचायतच्या महिला सरपंचाचा पक्षप्रवेश घडवून आणणे आणि स्त्रीनेतृत्वाला बदनाम करणे, ही अत्यंत निंदनीय व केविलवाणी बाब आहे, अशी तीव्र भावना हिंगणा विधानसभा मतदार क्षेत्रातील भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार आमदार समीर मेघे यांनी पत्रपरिषदेत व्यक्त केली.
दोन दिवसांपूर्वी हिंगणा विधानसभा क्षेत्रातील प्रतिस्पर्धी उमेदवार रमेशचंद्र बंग यांनी मांडव घोराडच्या सरपंच भारती डडमल यांचा एका कार्यक्रमात पक्षप्रवेश घडवून आणला. या पक्षप्रवेशाचे फोटो व व्हिडिओ लगेच सोशल मीडियावर टाकण्यात आले. या आकस्मिक घटनेने व्यथित झालेल्या सरपंच भारती डडमल यांनी आमदार समीर मेघे यांची भेट घेऊन आपली आपबिती सांगितली आणि मी भारतीय जनता पक्षासोबत आहे, असे स्पष्ट करून मेघे यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास दर्शविला.
समीर मेघे यांनीही या घटनेची गांभीर्याने दखल घेत पत्रकार परिषद घेऊन भारती डडमल यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश नाट्यावर प्रकाश टाकला. राष्ट्रवादी काँग्रेसचे गावातील नेते गोकुलदास मिनियार व इतर लोकांनी भूलथापा देऊन तसेच चुकीचे कारण सांगून आपल्याला बंग यांच्या निवासस्थानी नेले. तिथे पूर्वकल्पना न देता तसेच विश्वासात न घेता आपल्या गळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचा दुपट्टा टाकून पक्षप्रवेश झाल्याचे सांगितले, अशी माहिती यावेळी भारती डडमल यांनी दिली.
मी मांडव घोराड गावात मागील चारपाच वर्षात अनेक विकासाची कामे केली आहेत. कधीकाळी राष्ट्रवादीचे वर्चस्व असलेल्या या गावात मागील निवडणुकीत एकतर्फी विजय मिळवून ही ग्रामपंचायत भाजपकडे खेचून आणली. अश्यावेळी एका ज्येष्ठ नेत्याने अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन घडवून आणलेला हा जबरदस्तीचा पक्षप्रवेश निषेधार्थच आहे. त्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या भरवशावर माणसे जोडावीत, जबरदस्ती करून नव्हे, असेही मेघे म्हणाले. प्रतिस्पर्धी उमेदवारावर असे केविलवाणे कृत्य करण्याची वेळ यावी याबाबत आ. समीर मेघे यांनी खंत व्यक्त केली. पत्रपरिषदेला विजय डडमल, विशाल भोसले, विलास दाभेकर, पंकज गजभे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि मांडव घोराड ग्रामपंचायतचे सदस्य उपस्थित होते.

विकासाबद्दल जनताच उत्तर देईल – समीर मेघे
जो आमदार आपल्या दत्तक गावांचा विकास करू शकला नाही, तो मतदार संघाचा विकास काय करणार, असे म्हणणाऱ्यांना जनताच मतपेटीतून उत्तर देईल, असे प्रत्युत्तर आ. समीर मेघे यांनी हिंगणा येथे आयोजित जाहीर सभेत दिले. मी ज्या कुटुंबातून आलो त्या परिवाराने इतरांना देण्याचेच काम केले आहे. कुणाकडून हिसकावून घेण्याची संस्कृती आमची नाही. मी दहा वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत पाच पैशांचाही भ्रष्टाचार कधी केला नाही. उलट, ज्या गोष्टी आमदार निधीतून शक्य नव्हत्या त्या गोष्टीही आम्ही स्वखर्चाने केल्या आहेत. राजकारणाला आम्ही कमाईचे साधन मानत नाही, तर तो समाजाच्या हितासाठी असलेला मार्ग आहे, याची आम्हाला जाणीव आहे. त्यामुळे, ज्यांचे आयुष्यच भ्रष्टाचार व अत्याचार करण्यात गेले आहे आणि आपल्या कारकिर्दीत ज्यांनी कधी सामान्य जनतेची कामे केली नाहीत, त्यांनी आम्हाला नीतिमूल्याच्या गोष्टी शिकवू नये, असे परखड मत समीर मेघे यांनी मांडले. मी दहा वर्षात केलेली कामे लोकांच्या डोळ्यासमोर आहे आणि म्हणूनच हिंगणा क्षेत्रातील नेते, कार्यकर्ते आणि जनता पूर्ण ताकदीने माझ्यासोबत उभी असते, असेही मेघे यावेळी म्हणाले.