
उद्धव ठाकरेंना नेत्याचे पत्र
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू रामाबद्दल केलेले वादग्रस्त वक्तव्य राजकीय वादाचा विषय ठरले. या वादात ठाकरे गटाने कमालीचे मौन बाळगलेले असताना भाजप नेतेे राम कदम यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून “रामाची चेष्टा तुम्हाला मान्य आहे का?”, असा सवाल उपस्थित केलाय.
“राम मांसाहारी होते”, असे वक्तव्य आव्हाडांनी केल्यावर मोठा वाद झाला. या वादात उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. कदम यांनी नेमके त्यावर बोट ठेवले आहे. कदम यांनी उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, “मी आपणांस हे पत्र एक हिंदू म्हणून लिहतो आहे.. पक्षाचा कार्यकर्ता म्हणून नाही. आपण राज्याचे माजी मुख्यमंत्री अन् ज्येष्ठ नेते आहत. आपल्या घटक पक्षातील नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू रामाला मांसाहारी आहेत असे म्हटले. त्यांच्या या राम भक्तांच्या भावना दुखावणाऱ्या विधानावरून देशभर आक्रोश सुरु झाला. अनेक आंदोलने निदर्शने झाली. संपूर्ण हिंदू समाज पेटून उठला. त्यानंतर अपेक्षा होती त्यांनी माफी मागावी ही अपेक्षा होती. मात्र त्यांनी माफी न मागता उलट प्रभू राम आणि सीता मदिरापान करत होते, अशी प्रभू रामाची चेष्टा करणारे काही कागद दाखवून अजून तीव्र भावना भडकविण्याचा प्रयत्न केला.”
कदम आपल्या पत्रात लिहितात “आज देशभरातील समस्त संत साधू समाज..करोडो करोडो रामभक्त आश्चर्य व्यक्त करत आहेत. की आपण अथवा आपले प्रवक्ते संजय राऊत गप्प का ? स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे म्हणजे शिवसेनेचे कार्यकर्ते सुद्धा आव्हाडावर तुटून पडले. त्यांनी दाखवून दिले की तेच खरे स्वर्गीय बाळासाहेबांचे उत्तराधिकारी आहेत. मात्र तुम्ही थंड बसलात? का ? कुठे गेली तुमची हिंदुत्वची भाषा? मर्दूमकी? का विसर पडला तुम्हांला शिवरायांचा? हा तर प्रचंड गंभीर विषय आहे. समाजाच्या श्रद्धा आणि आस्थेचा गांभीर्याने घेण्याचा विषय असताना सुद्धा आपण मौन का ? हा कैक कोटी मिलियन डॉलरचा महत्वपूर्ण प्रश्न हिंदू समाजाला पडला आहे..”
“भगवान रामाची आव्हाडांनी केलेली चेष्टा तुम्हांला मान्य आहे का ? अन् नसेल तर आपण अजून पर्यंत खंडन का केले नाही? प्रत्येक भाषणात अथवा चर्चेत सुद्धा तुमचा आवडता शब्द.. मर्द… मर्द… किमान 25 वेळा उच्चारल्याशिवाय… किंवा तुमच्या भाषेत किंबहुना.. कोथळा.. कडे कपारी..महाराष्ट्र धर्म.. कोठे दडलीय ही शब्द संपदा..? त्यामुळे आपण रामभक्तासोबत आहत की आव्हाडांचे समर्थन करता हे देशभरातील संत साधू समाज आणी हिंदू समाजाला कळले पाहिजे..अन्यथा आपले मौन हे स्पष्ट करेल की आपणास हिंदू धर्माशी काहीही देणे घेणे नाही.आणि होय वेळ मिळाला तर जरूर फेसबुकवर देशभरातील साधू संत आणी हिंदू समाज आपल्या मौन असण्याबाबत काय बोलतो आहे ते जरूर पाहा..नाही तर संजय आहेतच तुम्हाला घरं बसल्या सर्व सांगण्यासाठी.. महाभारतातील व्यवस्था आजही आपल्या कडे आहे..समस्त हिंदूना आपल्या उत्तरांची अपेक्षा.. केवळ .. शाब्दिक कोट्याची नाही..”, असेही कदम यांनी नमूद केले आहे.