
(Mumbai)मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड हे वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्धच आहेत. आता त्यांनी प्रभू श्रीरामांबद्दल केलेले आक्षेपार्ह वक्तव्य वादाचा विषय ठरला आहे. शिर्डीत राष्ट्रवादीच्या शिबीरात आव्हाड यांनी राम मांसाहारी होते, असे वक्तव्य करुन वाद ओढवून घेतला. त्यामुळे आता भाजपने त्यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची व अटक करण्याची मागणी केली आहे. (Jitendra Awhad Controversial Statement)
जितेंद्र आव्हाडांविरोधात भाजप आक्रमक झाली असून आमदार राम कदम यांनी (Ram Kadam) त्यांच्याविरुद्ध घाटकोपर पोलिस तक्रार दाखल केली आहे. मुंबई, पुणे, नाशिक व नागपूरसह राज्यात अनेक ठिकाणी भाजपने आव्हाड यांच्याविरुद्ध आंदोलन सुरु केले आहे. जितेंद्र आव्हाडांना तात्काळ अटक करा, अशी मागणीही राम कदम यांनी केली आहे.
काय म्हणाले राम कदम?
(BJP leader Ram Kadam)भाजप नेते राम कदम यांनी आव्हाड यांना आव्हान दिले आहे. श्रीराम मांसाहारी होते याचा पुरावा आव्हाडांनी द्यावा, पुरावा नसेल तर आव्हाडांनी देशाची, राम भक्तांची माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. भव्यदिव्य राममंदिर बनत असल्याने यामुळे त्यांच्या पोटात दुखत असल्याचे कदम म्हणाले.
काय म्हणाले होते जितेंद्र आव्हाड?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डी येथील शिबीरात जितेंद्र आव्हाड यांनी मुक्ताफळे उधळली. “राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता, त्यांनी 14 वर्ष वनवास भोगला होता. मग ते शाकाहारी कसे असू शकतात?” असे वक्तव्य आमदार आव्हाड यांनी केले होते. आव्हाड पुढे म्हणाले की, आपण अनेक इतिहास लक्षात ठेवत नाही, वाचत नाही. राजकारणात वाहून जातो. राम हा आमचा, बहुजनांचा आहे. शिकार करून खाणारा राम हा बहुजनांचा आहे. रामाचा आदर्श सांगून लोकांवर शाकाहार थोपवला जात आहे. 14 वर्ष जंगलात असणारे राम शिकार करायचे, असेही ते म्हणाले.