संस्कृतीचा आणि ज्ञानाचा ध्वज जगभरात फडकवला

0

अहमदाबाद(Ahmedabad), 21 जून :- दहाव्या आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त केंद्रीय गृह तथा सहकारमंत्री अमित शाह(Amit Shah) यांनी अहमदाबाद येथे योगसाधना केली, आणि जगभरच्या योगप्रेमींना शुभेच्छा दिल्या.’आज सारे जग दहावा आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करत असल्याने, आजच्या दिवसाला विशेष महत्त्व आहे.’ असे मत अमित शाह यांनी यावेळी संमेलनात बोलताना व्यक्त केले. जगाला योगदिनाची भेट देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संस्कृतीचा आणि ज्ञानाचा ध्वज जगभरात फडकवला, असे गौरवोद्गारही शाह यांनी काढले.

“वर्ष2014 मध्ये नरेंद्र मोदी यांना भारताचे पंतप्रधान करण्यासाठी देशाने ऐतिहासिक बहुमत दिले. पंतप्रधान झाल्यावर नरेंद्र मोदी जेव्हा पहिल्यांदा संयुक्त राष्ट्रांच्या महासभेला उपस्थित राहिले, तेव्हा त्यांनी 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला”, असे शाह यांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले,”आपली प्राचीन शास्त्रे आणि आपल्या ऋषीमुनींनी मांडलेल्या संकल्पनांची अनोखी भेटच या प्रस्तावातून नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांनी जगभरच्या नेत्यांना दिली. काही दिवसांतच 170 पेक्षा अधिकदेशांनी योगदिन साजरा करण्यास मान्यता दिली आणि तेव्हापासून सारे जग योगमार्गाचे अनुसरण करू लागले”.

“मन, शरीर आणि आत्मा यांच्यात सुसंवाद प्रस्थापित करण्यासाठी योगापेक्षा महान असे कोणतेही शास्त्र/ विज्ञान अस्तित्वात नाही आणि आपल्या मनातील अमोघ शक्तींच्या अथांग महासागरात सूर मारण्यासाठी योग हेच एकमेव माध्यम आहे.” असे शाह म्हणाले. व्यक्तीच्या मनातील शक्तींचा आत्म्याशी संगम घडवून आणण्यासाठी आणि जगद्हिताचा मार्ग अनुसरताना त्याचा उपयोग करून घेण्यासाठी योगापेक्षा अधिक चांगले माध्यम असूच शकत नाही. त्याचबरोबर, आजमितीला पसरणाऱ्या अनेक विकारांवरही योग हेच उत्तर आहे” असेही ते म्हणाले.

गुजरात सरकारसह सर्वांच्या सहकार्याने आयोजित कार्यक्रमात आज सकाळी राज्यातील सुमारे 1.25 कोटी लोकांनी योगसाधना केली, अशी माहिती शाह यांनी दिली.

आपल्या वेदांमध्ये उपदेशिलेला ‘वसुधैव कुटुम्बकम् ।’ हा मंत्र योगामुळे सार्थ ठरतो. संपूर्ण जगाचा कल्याणमंत्र प्रत्यक्षात आणण्यासाठी सातत्यपूर्ण योगसाधना अत्यावश्यक आहे, असेही शाह म्हणाले.