

चकचकीत रस्त्यांचे आश्वासन फसले
चंद्रपूर :- शहरातील मेन रोड आणि गल्ल्यांमधील रस्त्यांची अवस्था अक्षरशः दयनीय झाली आहे. पावसामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून डांबर आणि गिट्टी वेगवेगळी झाली आहे. सिमेंट रस्त्यांची अवस्था पाहिल्यानंतर ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांनी जनतेचे पैसे अक्षरशः गिळंकृत केल्याचे स्पष्ट दिसून येते. इतकी प्रामाणिकपणा त्यांनी दाखवला की, सिमेंट रोडसाठी गिट्टी वापरायचीही तसदी घेतली नाही, तर कुठे बजरी, कुठे माती वापरून रस्ते उभे केले.
हे रस्ते नेमके मनपा, सार्वजनिक बांधकाम विभाग की महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी बनविले याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे. पण प्रश्न असा की, चंद्रपूरचे आमदार जोरगेवार यांनी शहराला चकचकीत रस्ते मिळतील असे दिलेले आश्वासन आणि प्रत्यक्षात पावसाच्या एका सरीने उद्वस्त झालेले रस्ते, यामध्ये मोठा विरोधाभास स्पष्ट दिसतो.
शहरातील नागरिक आता प्रश्न विचारत आहेत की, या रस्त्यांसाठी जनतेचे किती पैसे खर्च झाले आणि त्यातील किती टक्के अधिकारी व ठेकेदारांच्या खिशात गेले? कारण जनता हाच खरा मालक असून, निवडून आलेले आमदार व अधिकारी हे जनतेचे सेवक आहेत. त्यामुळे या प्रश्नांची उत्तरे देणे ही त्यांची जबाबदारी आहे. मात्र स्थानिक लोकप्रतिनिधी आणि मनपाचे प्रशासक स्वतःला मालक समजून आपल्या स्वमर्जीची व स्वहिताची कामे करण्यात रस घेत आहेत.
शिवाय, एका पावसानेच डांबर, सिमेंट आणि गिट्टी उखडली तर त्याबाबत ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना जाब विचारणे ही आमदार यांची जबाबदारी आहे. पण ते तसे करतील यात शंकाच आहे. अन्यथा या सर्व भ्रष्टाचाराचे आरोप थेट त्यांच्या अंगावर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आज देश स्वतंत्र होऊन ७९ वर्षे झाली असली तरी इतक्या मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार कधीच दिसला नव्हता. खड्डेमय रस्ते आणि जनतेचा वाढता रोष हे प्रशासनासाठी धोक्याची घंटा ठरत आहेत. भ्रष्टाचार आज शिस्ताचार झाला असून, त्याची जिवंत उदाहरणे चंद्रपूरच्या रस्त्यांवर स्पष्टपणे दिसून येत आहेत.