

नवी दिल्ली (New Delhi) 29 ऑगस्ट :- लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी पुन्हा एकदा भारत जोडो यात्रा काढणार आहे. यापूर्वी त्यांनी दोन टप्प्यात यात्रा काढली असून आगामी यात्रा हा तिसरा टप्पा असेल.
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सोशल मीडियावर मार्शल आर्टचा व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय संदेश देण्याचे कामही राहुल गांधींनी केले. भारत जोडो यात्रा लवकरच काढणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राहुल गांधींची ही भारत जोडो यात्रा सुरू होणार आहे. भारत जोडो यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याचे नियोजन सुरु झाले आहे. त्यासाठी यात्रा मार्गाचा नकाशा तयार करण्यात येत आहे. त्यांच्या यात्रा मार्गामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीचा पूर्ण विचार केला जाईल. सर्व तयारी झाल्यानंतर यात्रेची औपचारिक घोषणा केली जाईल, असे काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले.
यंदा हरियाणा, जम्मू-काश्मीर, महाराष्ट्र आणि झारखंड या 4 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. पुढील वर्षी दिल्ली आणि बिहारमध्ये विधानसभा निवडणुका आहेत. आगामी 2026 च्या मार्च ते मे या कालावधीत पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, पुडुचेरी, केरळ या 5 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या तिसऱ्या भागात या सर्व राज्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून रोड मॅप तयार करण्यात येणार आहे. या वर्षी होणाऱ्या 4 राज्यांच्या विधानसभा निवडणुका काँग्रेससाठी (Congress) महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. या ठिकाणी काँग्रेस सत्तेत येण्याची आशा बाळगून आहे.