

Rahul Gandhi will be the Leader of Opposition in Loksabha
नवी दिल्ली, 25 जून (हिं.स.) : काँग्रेस नेते राहुल गांधी लोकसभेत विरोधी पक्षनेते असतील. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या घरी आज, मंगळवारी झालेल्या इंडि आघाडीच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. त्यानंतर प्रोटेम स्पीकर भर्तृहरि महताब यांनी पत्र पाठवून याबाबत कळवण्यात आलेय.
खर्गे यांच्या घरी झालेल्या इंडी आघाडीच्या बैठकीनंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार केसी वेणुगोपाल म्हणाले की, या बैठकीत राहुल गांधी यांना सभागृहात विरोधी पक्षनेते बनवण्याबाबत चर्चा झाली. या संदर्भात काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी प्रोटेम स्पीकरना पत्र लिहून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी असतील अशी माहिती कळवली आहे. इतर पदाधिकाऱ्यांबाबत नंतर निर्णय घेतला जाईल असे वेणुगोपाल यांनी सांगितले. काँग्रेस कार्यकारिणीच्या (सीडब्ल्यूसी) 9 जून रोजी झालेल्या बैठकीत राहुल गांधी यांना लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदी नियुक्त करावे असा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. या बैठकीनंतर राहुल गांधी यांनी विचार करण्यासाठी वेळ मागितला होता. त्यानंतर आज, मंगळवारी खर्गे यांच्या निवासस्थानी झालेल्या इंडी आघाडीच्या बैठकीत राहुल गांधी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.