राहुल गांधींनी घेतला नागपुरात तर्री पोह्याचा आस्वाद

0

नागपूर : राहुल गांधी दुसऱ्यांदा निवडणूक प्रचारासाठी विदर्भाच्या दौऱ्यावर आले होते. याआधी नागपुरात संविधान सन्मान संमेलनाला हजेरी लावून त्यांनी प्रचाराचा शुभारंभ केला होता. आज त्यांनी अमरावती जिल्ह्यातील धामणगाव आणि चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथे सभा घेतल्या. सभेनंतर ते हेलिकॉप्टरने नागपुरात परतले.

नागपुरात परतल्यानंतर, दिल्लीला जाण्याआधी राहुल गांधींना नागपूरच्या प्रसिद्ध तर्री पोह्यांची आठवण झाली. त्यांनी थेट छत्रपती चौकातील प्रसिद्ध रामजी श्यामजी पोहेवाला येथे भेट दिली. तेथे त्यांनी पोहे खाताना पोहेवाल्याशी संवाद साधला. त्यांच्या व्यवसायाविषयी विचारपूस करताना त्यांनी रोजची कमाई, खर्च, व बचतीसंदर्भात माहिती घेतली.

या भेटीदरम्यान त्यांनी उपस्थित ग्राहकांशीही संवाद साधला. राहुल गांधींना पाहताच परिसरातील युवक-युवती मोठ्या संख्येने छत्रपती चौकाकडे धावले. अनेकांनी त्यांच्या सोबत सेल्फी घेतली.

काँग्रेसचे दक्षिण-पश्चिम नागपूरचे उमेदवार प्रफुल्ल गुडधे यांनी सांगितले की, “राहुल गांधी सायंकाळी सव्वापाच वाजता नागपुरात आले होते. त्यांनी पोहे खाल्ले आणि नागरिकांशी संवाद साधला. ते सुमारे पाऊण तास येथे होते.”राहुल गांधींच्या या अनौपचारिक भेटीने स्थानिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.