संस्कार भारतीच्या वतीने भरतमुनी जयंतीनिमित्त एकपात्री प्रयोग 

0

हिंदुत्वाचा, स्त्रीत्वाचा धगधगता इतिहास म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर – दीपाली घोंगे

यवतमाळ (Yawatmal),
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Punyashloka Ahilyadevi Holkar) यांनी आपल्या कर्तृत्वाने राज्यकारभाराचा, कठोर प्रशासनाचा आणि मूल्यसंवर्धनाचा उच्चतम आदर्श घालून दिला. राज्याचे रक्षण करणाऱ्या शस्त्रावर आणि संस्कृतीचे रक्षण करणाऱ्या शास्त्रावर त्यांचा विश्वास होता. राज्यकारभार करताना त्यांनी नात्यागोत्यांपेक्षाही नीतीमत्तेला महत्त्व दिले. स्त्रीचा पदर फार महत्त्वाचा असतो. ‘पदर घे, पदरात घे, प्रसंगी पदर खोच, पदरमोड कर परंतु स्वाभिमानाचे प्रतीक असणारा हा पदर कोणाहीसमोर पसरू नको’ हे आशीर्वाद म्हणून मिळालेले शब्द त्यांनी जिवापाड जपले. मोडकळीस आलेल्या असंख्य मंदिरांचा जीर्णोद्धार करणाऱ्या अहिल्यादेवींचे जीवन म्हणजे हिंदुत्वाचा आणि स्त्रीत्वाचा धगधगता इतिहास आहे, असे प्रतिपादन नागपूर येथील सुप्रसिद्ध रंगकर्मी तथा संस्कार भारतीच्या विदर्भ प्रांत मंचीय कला सहसंयोजक दीपाली घोंगे यांनी आपल्या एकपात्री प्रयोगाद्वारे येथे केले.

संस्कार भारती यवतमाळच्या वतीने नाट्यशास्त्राचे जनक भरतमुनी जयंतीनिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी वर्षाचे निमित्त साधून हा प्रयोग आयोजित करण्यात आला होता. येथील बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रांगणात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर विशुद्ध व वाणिज्य महाविद्यालय ट्रस्टचे अध्यक्ष विनायक दाते, उबंटू इंग्लिश मीडियम स्कूलचे अध्यक्ष पांडुरंग खांदवे, सचिव संभाजी राणे, यवतमाळचे तहसीलदार डॉ. योगेश देशमुख, यवतमाळ जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य रेणू संजय शिंदे, संस्कार भारतीचे प्रांत उपाध्यक्ष आनंद कसंबे, समिती अध्यक्ष डाॅ. ताराचंद कंठाळे, मंत्री अपर्णा शेलार व कार्यक्रम संयोजक डाॅ. ललिता घोडे प्रामुख्याने उपस्थित होते.

मान्यवर अतिथींच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन व नटराज पूजनाने प्रारंभ झालेल्या या कार्यक्रमात दीपाली घोंगे यांनी आपल्या एकपात्री नाट्यप्रयोगाद्वारे कर्तृत्वशालिनी पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे बालपणापासून मृत्यूपर्यंतचे दिव्य जीवनचरित्र रसिकांसमोर जिवंत केले. या देखण्या एकपात्री प्रयोगाने उपस्थित यवतमाळकर रसिक मंत्रमुग्ध झाले होते.

याच कार्यक्रमात भूमिका सुजित राय या छोट्या मुलीने ब्रेल लिपीमध्ये वाचन करण्याचा उच्चांक गाठून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्वतःचे नाव नोंदवल्याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला. एकपात्री प्रयोगाच्या निमित्ताने सुप्रसिद्ध चित्रकार, रांगोळीकार अरुण लोणारकर व संजय सांबजवार यांनी चितारलेल्या अहिल्यादेवींच्या पोर्ट्रेट रांगोळीने सर्वांचे लक्ष वेधले होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चैताली सराफ यांनी केले. प्रास्ताविक संस्कार भारतीचे अध्यक्ष प्रा. डॉ. ताराचंद कंठाळे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय कार्यक्रमाच्या संयोजक डॉ. ललिता घोडे यांनी करून दिला तर आभारप्रदर्शन संस्कार भारती यवतमाळच्या मंत्री अपर्णा शेलार यांनी केले. या कार्यक्रमास भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष कीर्ती राऊत, सेवा समर्पण संस्थेचे उपाध्यक्ष सुरेश राठी, सचिव अनंत कौलगीकर, डाॅ. सौ. माणिक मेहरे, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राजेश मदने यांच्यासह मोठ्या संख्येने यवतमाळकर नागरिक बंधुभगिनी उपस्थित होते.