
नागपूर (Nagpur), 18 एप्रिल
यामिनी पायघन यांच्या ओंजळीतील शब्द स्वरांच्या माध्यमातून सभागृहात विखुरल्याने वातावरण नादमय झाले. या स्वर लहरींनी उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले.
यशवंतराव चव्हाण सेंटर आणि विद्या विकास पब्लिशिंग हाऊस यांच्या संयुक्त विद्यमाने यामिनी पायघन लिखित ‘शब्द ओंजळीतले’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन तसेच त्यातील कवितांवरील गाण्याचा कार्यक्रम लक्ष्मीनगर येथील सायंटिफिक सभागृहात शुक्रवारी करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून जी.एच. रायसोनी युनिव्हर्सिटी, अमरावतीचे कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे, प्रसिद्ध संगीतकार शैलेश दाणी यशवंतराव चव्हाण सेंटरचे महेश बंग, ज्येष्ठ रंगकर्मी प्रभाकरराव ठेंगडी, जयंतराव उपगडे, यामिनी पायघन उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी यामिनी पायघन यांच्या कवितासंग्रहाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
प्रकाशनादरम्यान पुस्तकावर अभिप्राय व्यक्त करताना डॉ. विनायक देशपांडे यांनी, काव्यनिर्मिती करणे म्हणजे फक्त तुकबंदी नाही. दुसर्याच्या मनातील भावना जाणून घेण्याची ताकद कवींमध्येच आहे. माय मराठीने काव्याचे अनेक प्रकार रसिकांपर्यंत पोहोचवले. यामिनी पायघन यांच्या पुस्तकात विविध प्रकारच्या कवितांचा समावेश आहे. भिंत लपंडावांची, शहाणं झालेलं बाळ या कविता भावल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
विदर्भातील उभरत्या संगीतकारांमध्ये यामिनी पायघन यांचा समावेश असून त्यांनीच संगीतबद्ध केलेल्या ‘ओंजळ स्वरांची’ या सांगीतिक कार्यक्रमात काव्यसंग्रहातील काही कविता यामिनी पायघन यांच्याच संगीत नियोजनात सादर करण्यात आल्या.
मंजिरी वैद्य-अय्यर यांनी सादर केलेल्या ‘शंकर शिव महादेव करुणाकरा’ या गाण्याने संगीतमय कार्यक्रमाची सुरुवात झाली. ‘अक्कलकोटी’ हे गीत देखील त्यांनी सादर केले. यानंतर पुस्तकातील संगीतबद्ध केलेल्या कविता कलाकारांनी सादर केल्या. यामिनी पायघन यांनी ‘प्रणाम माझा गुरुराया तुज’, ‘हात तुझा’, ‘बसो मोरे’, आदित्य सावरकर यांनी ‘गजानन भक्तांचा कैवारी’, ‘बिती उमर का’, तसेच गोंधळ सादर केला. श्रीकांत यांनी ‘बालों में सजा’, मंजिरी यांनी लावणी सादर केली. ‘चला जाऊ या’ हे गीत बाल कलाकारांनी सादर केले. कोरसमध्ये शिवानी आमडेक, पल्लवी नाकाडे, अनुराम पेशकार, हृषीकेश खोडे यांनी उत्कृष्ट साथ दिली.
कार्यक्रमाचे उत्तम निवेदन कार्यक्रमाचे संयोजक प्रफुल्ल माटेगावकर यांनी केले. कार्यक्रमात अथर्व गायकी, सई पायघन, देवांश मोरे, अद्विका मेश्राम, श्रावणी पिसे, शुभदा बावणे, अवनिषा अय्यर, कियान वैद्य, परीक्षित आणि परंतप बावईकर, शमी किटकरू या बालकलाकारांचा समावेश होता. गायक कलाकारांना प्रमोद बावने, हर्षद पायघन, विक्रम जोशी, श्रीकांत पिसे, आर्य पुराणकर, गौरव टांकसाळे, जयंत उपगडे या वाद्यवृंदांनी छान साथ दिली. कार्यक्रमात दीपलक्ष्मी भट आणि उमा पाठक यांनी नाट्य सादर केले. कार्यक्रमाला रसिकांनी मोठी गर्दी केली होती.
यावेळी पराग घोंगे, रमेश लखमापुरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
















