भाजपचा मुस्लिम समाजात जनसंपर्क, मान्यवरांच्या भेटीगाठी

0

मुंबई- भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी अंजुमन-ए-इस्लाम सोसायटीचे अध्यक्ष डॉ. जहीर काझी यांची भेट घेतली. अंजुमन-ए-इस्लाम सोसायटीचे शैक्षणिक क्षेत्रात मोठे सामाजिक कार्य असल्याने ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. (BJP Leaders Meet Prominent Muslim Leaders) आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने व्यापक जनसंपर्क मोहिम हाती घेतली असून त्याचाच हा भाग असल्याचे मानले जात आहे. भाजपने मुस्लिम समाजातील बुद्धिजीवी वर्गाच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. भाजपचे राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाश यांनी मुस्लिमबहुल मालवणी (मालाड) परिसराला भेट देऊन मुस्लिम समाजात प्रभाव असलेले डॉ. इशरार अहमद यांची त्यांनी भेट घेतली.
मालवणी परिसर मालाड विधानसभा मतदारसंघांतर्गत येतो. तेथे मुस्लिम समाजाचे अस्लम शेख हे काँग्रेसचे आमदार आहेत. विशेष म्हणजे, एका अंदाजानुसार महाराष्ट्रात 12 टक्के मुस्लिम (एक कोटी 30 लाखांहून अधिक) आहेत. मुंबई शहरात सुमारे 25 टक्के मुस्लिम लोकसंख्या आहे आणि उपनगरात ती सुमारे 19 टक्के आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या दृष्टीने मुस्लिम समाजापर्यंत पोहोचण्याचे भाजपचे प्रयत्न आहेत. भाजपची मुस्लिमविरोधी प्रतिमा निर्माण करण्याचे प्रयत्न विरोधकांकडून सुरु आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपने मुस्लिम समाजाशी संवाद वाढविण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.