पब्लिक रिलेशन कौन्सिल ऑफ इंडिया (PRCI) च्या २१व्या स्थापना दिवसाचे नागपूर येथे उत्साहात आयोजन

0

नागपूर (nagpur) | ५ एप्रिल २०२५ : पब्लिक रिलेशन्स कौन्सिल ऑफ इंडिया (PRCI) च्या नागपूर विभागाच्या वतीने २१वा स्थापना दिवस अत्यंत उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. फोटोग्राफी असोसिएशन ऑफ नागपूर आणि अरिहंत हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला विविध मान्यवर, माध्यम प्रतिनिधी आणि जनसंपर्क क्षेत्रातील जाणकारांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे म्हणून “संपर्क आणि संवाद” क्षेत्रातील मान्यवर श्री. संजय अग्रवाल उपस्थित होते. आपल्या भाषणात त्यांनी जनसंपर्क हा केवळ व्यवसाय नसून प्रतिमा निर्मिती, ब्रँड ओळख निर्माण आणि प्रभावी संवादाचे साधन असल्याचे अधोरेखित केले. नागपूर PRCI च्या उपक्रमशीलतेचे आणि सातत्यपूर्ण कार्याचे त्यांनी विशेष कौतुक केले.

अरिहंत हॉस्पिटलचे संस्थापक श्री. निखिल कुसुमगर व संचालिका डॉ. पलक कुसुमगर शाह, NPPA चे अध्यक्ष संदीप गुरघाटे आणि PRCI चे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य व वरिष्ठ उपाध्यक्ष (मध्य भारत) श्री. आशिष तायल हे कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. यासह अनेक मान्यवरांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली.

कार्यक्रमात माध्यम क्षेत्रातील पाच जेष्ठ वृत्त छायाचित्रकार व्हिडीओग्राफर्सचा सन्मान करण्यात आला. श्री. शैलेश मिश्रा, श्री. विनय लोहित, श्री. सुरेश (छोटू) वैतागे, श्री. अनिरुद्ध कापटकर, आणि श्री. सतीश राऊत यांचा त्यांच्या दीर्घकालीन योगदानासाठी गौरव करण्यात आला. ज्येष्ठ छायाचित्रकार अनंत मुळे यांनी आपल्या खास शैलीत अनुभव कथन केले, तर शैलेश मिश्रा यांनी PRCI आणि अरिहंत हॉस्पिटल्स विषयी आपली कृतज्ञता व्यक्त केली.

समाजहितासाठी अरिहंत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या सहकार्याने कार्यक्रमानंतर माध्यम प्रतिनिधींसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. सुमारे ५० माध्यम कर्मचाऱ्यांनी या आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.

या यशस्वी कार्यक्रमाच्या आयोजनात PRCI चे स्थानिक पदाधिकारी श्री. निखिलेश सावरकर, श्री. तरुण निर्बाण, श्री. साजिद ख्वाजा, आणि श्री. स्वप्निल भोगेकर यांनी मोलाची भूमिका बजावली. हा स्थापना दिवस PRCI च्या यशस्वी वाटचालीचे स्मरण करत, व्यावसायिक संवाद, समाजाभिमुखता आणि ज्ञानसंपादनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले.