

‘त्या फुलांच्या गंधकोषी’ला हाऊसफुल्ल गर्दी
नागपूर (Nagpur) 21 जून :-
पंडित हृदयनाथ मंगेशकर यांची विविध रंगांनी नटलेली गाणी ऐकताना शब्द, सुरावटीच्या वर्षावाने रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले. त्यांच्या मधुर संगीताने सजलेली गाणी गायक कलाकारांनी सादर करून रसिकांची मने जिंकली. सप्तकतर्फे ज्येष्ठ संगीतकार, गायक पंडित हृदयनाथ मंगेशकर (Pandit Hridaynath Mangeshkar) यांच्या अजरामर संगीत रचनांचा कार्यक्रम ‘त्या फुलांच्या गंधकोषी’ शनिवारी कवी कुलगुरू कलिदास सभागृहात आयोजित करण्यात आला. प्रमुख अतिथी प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर आणि राजेश लाखेकर यांनी गायक- वादकांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात मंजिरी वैद्य-अय्यर यांनी गगन सदन या प्रार्थनेने केली. यानंतर त्यांनी ‘गेले द्यायचे राहुनी’, ‘वारा गाई गाणे’, ‘सुन्या सुन्या मैफलीत माझ्या’, ‘भय इथले संपत नाही’ ही एकल गाणी, तर अजित परब यांच्यासोबत चिंब पावसानं, काजळ राती, रात्रीस खेळ चाले आदी गाणी सादर केली. अजित परब यांनी पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचे ‘दयाघना’, ‘लाजून हासणे अन्’, ‘आमही ठाकर’, ‘सुरमयी शाम’ आदी गाणी सादर केली. मनीषा निश्चल यांनी ‘असा बेभान हा वारा’ हे कोळी गीत, मी रात टाकली, यारा सिली सिली ही एकल तर युगलमध्ये संधीकाली आशा, माझे राणी माझे मोगा आदी गाणी उत्कृष्ठ सादर केली.
कार्यक्रमाचा समारोप अजित परब यांनी ‘त्या फुलांच्या गंधकोषी’ या अजरामर गीताने केली. सुप्रसिद्ध निवेदिका वृषाली देशपांडे यांनी संचालन करताना प्रत्येक गाण्याची पार्श्वभूमी आपल्या रसाळ वाणीने सांगून उपस्थित रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. प्रास्ताविक डॉ. उदय गुप्ते यांनी केले.
कि-बोर्डवर संगीत नियोजक महेंद्र ढोले, व्हायोलिनवर अमर शेंडे, बासरी अरविंद उपाध्ये, गिटारवर गौरव टांकसाळे, तबल्यावर अशोक टोकलवार, ढोलक अनिकेत दहिकर, ऑक्टोपॅड मनोहर वातुलकर, तालवाद्य विक्रम जोशी या वाद्यवृंदाने गायक कलाकारांना छान साथ दिली. कार्यक्रमाला निवृत्त न्यायमूर्ती विकास सिरपूरकर, सप्तकचे विलास मानेकर, श्रीकांत देशपांडे, उदय पाटणकर, प्रमोद कळमकर, नितीन सहस्रबुद्धे आदींसह सप्तकचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.