
नागपूर (Nagpur) 18 सप्टेंबर :- पं. गोपाळराव वाडेगावकर शिष्य परिवार, खासदार सांस्कृतिक महोत्सव समिती, सप्तक आणि दि ब्लाईंड रिलीफ असोसिएशनद्वारा कै. पं. गोपाळराव वाडेगावकर स्मृती द्विदिवसीय संगीत समारोह 20 आणि 21 सप्टेंबर 2024 रोजी आयोजित करण्यात आला आहे. यात संगीत क्षेत्रातील नामवंत कलाकार आपली कला सादर करणार आहेत.
दक्षिण अंबाझरी रोड येथील दि ब्लाईंड रिलीफ असोसिएशनच्या प्लॅटिनम जुबिली हॉल मध्ये शुक्रवारी 20 संध्या. 6 वाजता पं. गोपाळराव वाडेगावकर यांचे शिष्य सूर-ताल संसद सादर करणार आहेत. त्यानंतर मुंबईचे प्रसिद्ध तबलावादक ओजस अढ़िया यांचे एकल तबला वादन होईल. श्रीकांत पिसे लहरा संगत करतील.
शनिवारी, 21 तारखेला इटलीच्या लियो व्हर्तुनी यांचे एकल सतार वादन होणार असून त्यांना तबल्यावर फ्रांचेस्को घेरार्डी साथसंगत करणार आहेत. त्यानंतर, देवासच्या प्रसिद्ध विदुषी कलापिनी कोमकली यांचे सुश्राव्य गायन होणार आहे. त्यांना तबल्यावर पं. संदेश पोपटकर तर संवादिनीवर श्रीकांत पिसे साथसंगत करणार आहेत. या नि:शुल्क कार्यक्रमाचा रसिकांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केली आहे.
















