हिट अँड रन कायद्याचा निषेध, साखळी उपोषण

0

अमरावती AMRAWATI  – देशात लागू करण्यात आलेल्या नवीन हिट अँड रन कायद्याच्या विरोधात अमरावती जिल्हा वाहन चालक कृती समितीच्या नेतृत्वात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ( इर्विन) येथे बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. हा कायदा तात्काळ रद्द करण्याची मागणी त्यांनी रेटून धरली आहे.

भारतीय न्यायिक संहिता 2023 मध्ये दुरुस्ती केल्यानंतर, हिट अँड रन प्रकरणात दोषी चालकाला दंड आणि तुरुंगवासाची तरतूद आहे. या विरोधात वाहतूकदार, चालक संपावर गेले होते. विविध ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या नेतृत्वात राष्ट्रीय संप पुकारला होता. त्यानंतर याचा प्रभाव हा सर्वसामान्य नागरिकांवर झाला होता.

जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा बंद झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली होती. त्यामुळे शासनाने ट्रान्सपोर्ट संघटनांशी बैठक बोलावून तत्काळ चर्चा केली. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत संप मागे घेतला. पण वास्तविक पाहता हा कायदा मंजूर झाला असून त्याची अंमलबजावणी होणे बाकी आहे. त्यामुळे हा कायदा पूर्णतः रद्द करावा या साठी साखळी उपोषण सुरु करण्यात आले. 3 तारखेला अमरावतीत अमरावती जिल्हा वाहन चालक कृती समितीने मोर्चा काढला . तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे साखळी उपोषण सुरू केले.

या साखळी उपोषणाला भीम ब्रिगेडचे संघटना, भगवे वादळ, प्रहार वाहतूक संघटना, संघर्ष वाहन संघटना, भीम आर्मी, मालवाहतूक असोसिएशन, माल वाहतूक असोसिएशन यांच्यासह अनेक संघटनांनी पाठिंबा दिला.