प्रियांका गांधींच्या नागपूर रोड शोमध्ये गोंधळ; काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये वाद

0

काँग्रेसच्या स्टार नेत्या आणि वायनाडमधील उमेदवार प्रियांका गांधी आज विदर्भ दौऱ्यावर होत्या. गडचिरोलीतील प्रचारसभेनंतर नागपूरमध्ये त्यांच्या रोड शोचे आयोजन करण्यात आले होते. मध्य नागपूर मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार बंटी शेळके यांच्या प्रचारासाठी आयोजित या रोड शोदरम्यान काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये वाद निर्माण झाला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला.

गोंधळाची सुरुवात बडकस चौकात

नागपूरच्या जुन्या भागातील बडकस चौकात रोड शोचा समारोप झाला. या वेळी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने-सामने आले. त्यांनी आपापल्या पक्षाचे झेंडे दाखवत जोरदार घोषणाबाजी केली. प्रियांका गांधी यांचा रोड शो या मार्गावरून येणार असल्याचे समजताच भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. काँग्रेस कार्यकर्त्यांनीही त्याला प्रत्युत्तर देत घोषणाबाजी सुरू केली.

शाब्दिक वाद आणि पोलिसांची कारवाई

रॅली बडकस चौकात पोहोचताच दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक सुरू झाली. गोंधळ वाढत असल्याचे पाहून पोलिसांनी हस्तक्षेप करत बळाचा वापर केला. यावेळी भाजप समर्थकांनी घरांवरून आणि रस्त्यांवरून काँग्रेस कार्यकर्त्यांना भाजपचे झेंडे दाखवत घोषणाबाजी केली.

या घटनेमुळे स्थानिक राजकारण तापले असून, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. मात्र, या प्रकारामुळे नागपूरमध्ये आगामी निवडणुकीचा रंग अधिक चुरसदार होणार असल्याचे स्पष्टझाले आहे.