

नवी दिल्ली, 14 फेब्रुवारी – जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या जिहादी दहशतवाद्यांच्या हल्ल्यात हौतात्म्य पत्करणाऱ्या वीर जवानांना पंतप्रधानांनी श्रद्धांजली अर्पण केलीय. या भ्याड हल्ल्याला 5 वर्ष पूर्ण झाले असून त्याच्या दुःखद आठवणींचे स्मरण असल्याचे पंतप्रधानांनी ट्विटर संदेशात म्हंटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, बुधवारी युएई दौऱ्यावर असून तेथील हिंदू मंदिराचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होत आहे. दरम्यान, त्यांनी ट्विट करुन पुलवामा हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली वाहिली आहे. आपल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले की, पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या शूर वीरांना मी श्रद्धांजली अर्पण करतो.
त्यांची सेवा आणि आपल्या देशासाठीचे त्यांचं बलिदान नेहमीच स्मरणात राहील असे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात नमूद केले आहे. पंतप्रधानांसोबतच इतरही अनेक मंत्र्यांनी ट्विट करुन पुलवामा हल्ल्यातील शहीदांना आदरांजली वाहिली आहे.जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी पाकिस्तानच्या जिहादी दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या बसवर हल्ला केला होता. यात 40 जवानांना हौतात्म्य आले होते. या भ्याड हल्ल्यामागे पाकपुरस्कृत जैश-ए-मोहम्मद या जिहादी दहशतवादी संघटनेचा हात होता. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमधल्या बालाकोट येथे एअर स्ट्राइक करत शेकडो दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.