
अयोध्या-अयोध्या येथील राम मंदिराचा उद्घाटन सोहळा २२ जानेवारी रोजी होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्या दौऱ्यावर दाखल झाले. (PM Modi in Ayodhya) मोदी अयोध्येत दाखल होताच लाखोच्या जनसमुदायाने दुतर्फा रस्त्यावर उभे राहून त्यांचे स्वागत केले. यावेळी मोदी यांचा सुमारे ८ किलो मीटर लांबीचा रोड शो देखील पार पडला. मोदी यांनी नव्या अयोध्या धाम रेल्वे स्थानकाचे उद्घाटन केले व वंदे भारत आणि दोन अमृत भारत रेल्वेगाड्यांना हिरवा झेंडा दाखविला. यानंतर अयोध्येतील नव्या महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटनही मोदी यांच्या हस्ते पार पडले. याशिवाय पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते सुमारे १६ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणीही यावेळी पार पडली.
या निमित्ताने अयोध्या धाम रेल्वे स्थानक तसेच महर्षी वाल्मिकी विमानतळ रामकथा थीमवर सजविण्यात आले आहे. अयोध्या दौऱ्यात मोदी यांनी वरीष्ठ सुरक्षा अधिकारी धनिराम मांझी यांच्या घराला भेट दिली. पंतप्रधान मोदी यांचा महर्षि वाल्मिकी विमानतळापासून सुरू झालेला रोड शो अयोध्या धाम जंक्शन येथे संपला. येथे मोदींनी अयोध्या धाम जंक्शनचे उद्घाटन केले. अयोध्या धाम स्थानकाच्या उद्घाटनानंतर मोदींनी स्टेशनचा आढावा घेतला. ट्रेनमध्ये जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली. रोड शो दरम्यान मोदींचे स्वागत करण्यात आले. जवळपास एक लाख लोकांनी ५१ ठिकाणी पंतप्रधानांचे स्वागत केले.