

नागपूर(Nagpur) दि. 11 जुलै, 2025: पावसाळ्याच्या दिवसांत विजेच्या तारा, भिंती किंवा उपकरणांतून वीजप्रवाह उतरून अपघात होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असते. अशा गंभीर विद्युत अपघातांपासून स्वतःचा आणि कुटुंबाचा जीव वाचवण्यासाठी घर, दुकान किंवा इतर आस्थापनांमध्ये सर्किट ब्रेकरचे सुरक्षा कवच बसवून घ्यावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.
घरगुती वायरिंगमध्ये बिघाड, करंट लिकेज किंवा योग्य क्षमतेचे ‘सर्किट ब्रेकर’ आणि ‘अर्थिंग’ नसणे हीच या अपघातांची मुख्य कारणे असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. त्यामुळे वीज सुरक्षेला प्राधान्य देत प्रत्येक नागरिकाने खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे.
सर्किट ब्रेकर म्हणजे काय?
सर्किट ब्रेकर हे आपल्या घरातील किंवा व्यावसायिक ठिकाणातील विद्युत यंत्रणेसाठी एक अत्यंत महत्त्वाचे सुरक्षा कवच आहे. विजेच्या संभाव्य अपघातांपासून संरक्षण मिळवण्यासाठी आणि उपकरणे सुरक्षित ठेवण्यासाठी याचा वापर करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
एखाद्या सर्किटवर क्षमतेपेक्षा जास्त विद्युत भार (उदा. एकाच सॉकेटमध्ये अनेक उपकरणे लावणे) येतो, तेव्हा तारा गरम होतात आणि आग लागण्याचा धोका असतो. सर्किट ब्रेकर तात्काळ हा अतिरिक्त भार ओळखतो आणि वीजपुरवठा खंडित करतो, ज्यामुळे शॉर्ट सर्किट आणि आगीचा धोका टळतो. वायरिंगमध्ये बिघाड झाल्यास किंवा दोन विद्युत तारा एकमेकांना चिकटल्यास ‘शॉर्ट सर्किट’ होते. यामुळे अचानक प्रचंड विद्युत प्रवाह निर्माण होतो, ज्यामुळे उपकरणे जळू शकतात किंवा आग लागू शकते. सर्किट ब्रेकर हे धोकादायक शॉर्ट सर्किट होताच वीजप्रवाह बंद करतो. विशेषतः ‘अर्थ लीकेज सर्किट ब्रेकर’ (ELCB) किंवा ‘रेसिड्युअल करंट सर्किट ब्रेकर’ (RCCB) हे मानवी जीवाला विद्युत धक्क्यापासून वाचवण्यासाठी डिझाइन केलेले आहेत. जर एखाद्या व्यक्तीला विजेचा धक्का लागला किंवा विद्युत प्रवाहाची गळती (लीकेज) झाली, तर हे ब्रेकर काही मिलीसेकंदात वीजपुरवठा बंद करतात, ज्यामुळे गंभीर दुखापत किंवा मृत्यूचा धोका टळतो. फ्रिज, टीव्ही, वॉशिंग मशीन, पंखे यांसारख्या महागड्या विद्युत उपकरणांना ओव्हरलोड किंवा शॉर्ट सर्किटमुळे होणाऱ्या नुकसानीपासून वाचवण्यासाठी सर्किट ब्रेकर अत्यंत प्रभावी ठरतो. वीज अचानक बंद झाल्याने उपकरणांना नुकसान होत नाही. घरातील एखाद्या विशिष्ट भागातील वायरिंगमध्ये काम करायचे असल्यास, त्या भागातील सर्किट ब्रेकर बंद करून सुरक्षितपणे काम करता येते, ज्यामुळे संपूर्ण घराची वीज बंद करण्याची गरज लागत नाही. त्यामुळे, मिनिएचर सर्किट ब्रेकर (MCB), अर्थ लीकेज सर्किट ब्रेकर (ELCB) किंवा रेसिड्युअल करंट सर्किट ब्रेकर (RCCB) यांसारखे योग्य क्षमतेचे सर्किट ब्रेकर घरात बसवण्याचे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.
केवळ सर्किट ब्रेकरच नव्हे, तर वीज सुरक्षा व्यवस्थेमध्ये ‘अर्थिंग’ हे तितकेच महत्त्वाचे आहे. घरात किंवा उपकरणांमध्ये अतिरिक्त वीजप्रवाह निर्माण झाल्यास, तो सुरक्षितपणे जमिनीखालील ‘अर्थिंग’द्वारे वाहून जातो. यामुळे विजेचा धक्का बसण्याचा धोका टळतो. नवीन वास्तू बांधताना अर्थिंगसह सर्किट ब्रेकर बसवणे अनिवार्य आहे. मात्र, जुन्या इमारतींमध्ये किंवा घरात ते बसवलेले नसल्यास, ते तातडीने बसवून घेणे आवश्यक आहे. तसेच, प्रत्येक दोन वर्षांनी आपल्या घरातील अर्थिंग योग्य स्थितीत आहे की नाही, याची खात्री करून घ्यावी, असेही महावितरणने सांगितले आहे.
याचसोबत बाजारात केवळ 20 ते 50 रुपयांत उपलब्ध असलेल्या विद्युत टेस्टरचा उपयोग करून भिंती, पत्रे, कपडे वाळत घालण्याची लोखंडी तार, फ्रीज, कुलर, गिझर किंवा नळ यांसारख्या वस्तूंना स्पर्श करण्यापूर्वी तपासणी करा. जर टेस्टरमधील दिवा लागला, तर याचा अर्थ त्या वस्तूमध्ये वीजप्रवाह उतरला आहे आणि तिला स्पर्श करणे धोकादायक आहे. घरात किंवा घराबाहेरील ओल्या ठिकाणी विजेच्या उपकरणांशी काम करताना पायात रबरी किंवा प्लास्टिकची चप्पल अवश्य वापरा. ओलसर लोखंडी पाईप, कृषिपंपाची पेटी किंवा पाण्याच्या मोटारपंपांना हात लावण्यापूर्वी त्याची तपासणी करण्याच्या सुचना देखील नागरिकांना करण्यात आल्या आहेत.
वीज सुरक्षा ही केवळ वैयक्तिक जबाबदारी नसून, ते एक सामाजिक दायित्व आहे, प्रत्येक नागरिकाने विजेचा वापर करताना योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. सर्किट ब्रेकर आणि योग्य अर्थिंगची तपासणी करून आपण केवळ स्वतःचा जीवच वाचवत नाही, तर कुटुंबातील सदस्यांना आणि परिसरातील इतरांनाही संभाव्य अपघातांपासून सुरक्षित ठेवतो. ही सामूहिक जबाबदारी आहे, जी सर्वांनी मिळून पार पाडल्यास विद्युत अपघातांवर निश्चितपणे नियंत्रण मिळवता येईल, असेही महावितरणने स्पष्ट केले आहे.
उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,
महावितरण, नागपूर