
नागपूर, 6 डिसेंबर 2023
भारत सरकारचे सांस्कृतिक कार्य मंत्रालय, निर्झर कला संस्था, गुरु कुंदनलाल गंगाणी फाउंडेशन आणि गुरु साधना फाऊंडेशन यांच्या द्वारे ‘कथक अश्वमेध’ या आंतरराष्ट्रीय कथ्थक नृत्य स्पर्धेची विदर्भातील प्राथमिक फेरी नागपुरात शनिवार, 9 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 9 ते 6 यावेळात अशोका ट्रेनिंग रुम, चिटणवीस सेंटर, सिव्हील लाईन्स, नागपूर येथे आयोजित करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ती मिनाक्षी सरवटे यांच्या हस्ते प्राथमिक फेरीचे उद्घाटन होणार आहे.
या स्पर्धेत विदर्भातील कथकचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. तरुण पिढीला त्यांच्या प्राचीन कला आणि संस्कृतीकडे आकर्षित करणे आणि कथक नृत्याला समृद्ध करून उपजीविकेचे साधन बनवण्यासाठी तरुणांना प्रेरित करणे या उद्देशाने डॉ. साधना नाफडे आणि पंडित कुंदनलाल गंगाणी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ही स्पर्धा घेण्यात येत आहे. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी www.nirzar.org या संकेतस्थळावर भेट देऊन ऑनलाईन नोंदणी करता येईल. कार्यक्रम स्थळीदेखील नावे नोंदणीची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
‘कथक अश्वमेध’ ची प्राथमिक फेरी भारतातील 40 वेगवेगळ्या शहरांमध्ये होत आहे. 12 ते 25 वयोगट व 26 ते 40 वयोगट अशा दोन गटात ही स्पर्धा होत आहे. प्राथमिक फेरीतून 140 विद्यार्थ्यांची निवड केली जाणार असून त्यापैकी सर्वोत्कृष्ट 7 नर्तक (प्रत्येक गटातले) महाअंतिम फेरीसाठी निवडले जातील. महाअंतिम फेरीत दिल्लीत होणार असून या कलाकारांनी कला सादर करण्याची संधी मिळणार आहे. दोन्ही गटातील अंतिम 3 विजेत्यांना भरघोस बक्षिसे दिली जाणार आहेत. कथक नृत्य शिकणारे विद्यार्थी व कलाकारांनी या संधीचा लाभ घ्यावा,असे आवाहन आयोजकांनी केले आहे.