मान्सूनपूर्व कामे महावितरणकडून वेगात सुरू

0

नागपूर (NAGPUR), 21 मे 2025: कडक उन्हाळा, अवकाळी पाऊस आणि आता दाराशी आलेला मान्सून… या बदलत्या वातावरणातही वीज ग्राहकांना अखंडित आणि सुरळीत वीजपुरवठा मिळावा यासाठी महावितरणने कंबर कसली आहे. संपूर्ण जिल्ह्यात मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीची कामे वेगाने सुरू असून, यात वीज वाहिन्यांच्या आड येणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडण्यासह अनेक महत्त्वपूर्ण कामांचा समावेश आहे.

सेवा अखंडित ठेवण्यासाठी महावितरण सज्ज

मे महिन्यात विदर्भात अंगाची लाहीलाही करणारे तापमान असतानाही, महावितरणचे कर्मचारी देखभाल व दुरुस्तीच्या कामांमध्ये व्यस्त आहेत. वीज वितरण यंत्रणेतील बहुतांश उपकरणे खुल्या वातावरणात असल्याने, हवामानातील बदलांचा थेट परिणाम वीजपुरवठ्यावर होतो. यामुळे उन्हाळा आणि त्यानंतर येणारा पावसाळा वीज ग्राहकांसाठी सुसह्य व्हावा, यासाठी महावितरणने मोठ्या प्रमाणावर कामे हाती घेतली आहेत. यासाठी आवश्यक निधीची तरतूदही करण्यात आली असून, पावसाळ्यात वीजपुरवठ्यातील बिघाड कमीत कमी होतील, याची खात्री केली जात आहे. रोहित्रे, पोल, इन्सुलेटर यांसारख्या सर्व सामग्री आणि उपकरणांचा पुरेसा साठा ठेवण्याच्या सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

अडथळे दूर करण्याचे काम युद्धपातळीवर
वीज वाहिन्यांवर लोंबकळणाऱ्या झाडांच्या फांद्या, पतंग, मांजा, पताका, तोरण, फ्लेक्स बॅनर्स आणि प्लास्टिकचे झेंडे यामुळे वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना घडतात. हे टाळण्यासाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मदतीने फांद्या तोडण्याचे आणि वाहिन्यांमध्ये अडकलेले अडथळे दूर करण्याचे काम सुरू आहे.

याशिवाय, सैल झालेले गार्डिंग व स्पॅन घट्ट करणे, दोन खांबांमधील झोल पडलेल्या तारा ओढून घेणे, सर्व खांब आणि त्यांचे ताण सुस्थितीत आणणे, तुटलेले पिन आणि डिस्क इन्सुलेटर बदलणे, वीज उपकेंद्रातील रोहित्रांमधील तेलाची पातळी तपासणे, ब्रिदरमधील सिलिका जेल बदलणे यांसारखी कामेही वेगाने सुरू आहेत.

अर्थिंगला प्राधान्य, यंत्रणेचे बळकटीकरण
वीज वितरण यंत्रणेत अर्थिंगला विशेष महत्त्व असल्याने, रोहित्रांचे अर्थिंग मजबूत करणे, पोल, वितरण पेट्या, फीडर पिलर्स, मिनी फीडर पिलर्स यांचे अर्थिंग सुस्थितीत करण्याचे काम मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात आले आहे. तसेच, वीज खांब आणि तारांचे मजबुतीकरण, जुन्या फीडर पिलरमध्ये इन्सुलेशन स्प्रे मारणे, पावसाचे पाणी साचणाऱ्या परिसरातील फीडर पिलरची उंची वाढवणे, ऑइल फिल्टरेशन, उपकेंद्रातील ब्रेकरची दुरुस्ती, बॅटरी चार्जिंग, फ्यूज बदलणे अशी विविध कामे सर्वत्र सुरु आहेत.

महावितरणचे सहकार्याचे आवाहन
वाढत्या तापमानामुळे ग्राहकांना विजेअभावी होणाऱ्या त्रासाची महावितरणला पूर्ण जाणीव आहे. मात्र, ही देखभाल दुरुस्तीची कामे अखंडित, सुरळीत आणि सुरक्षित ग्राहक सेवेसाठी अत्यंत आवश्यक आहेत. त्यामुळे वीज ग्राहकांनी या काळात थोडे सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे. सर्व संभाव्य ग्राहकांना त्यांच्या भागात सुरू असलेल्या कामांची माहिती मिळावी यासाठी मोबाईल ॲप आणि एनडीएमद्वारे नियोजित आऊटेजेसची नोंद करण्याच्या सूचनाही सर्व संबंधितांना देण्यात आल्या आहेत.

फोटो ओळ: वीज वाहिन्यांवर लोंबकळणाऱ्या झाडांच्या फांद्या कापतांना महावितरण कर्मचारी

उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,
महावितरण, नागपूर