श्री गजानन महाराजांना 3000 क‍िलो खिचडीचा प्रसाद

0

 

– खासदार सांस्‍कृत‍िक महोत्‍सवात विष्णू मनोहर यांचा उपक्रम

(Nagpur)नागपूर -खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवामध्‍ये ईश्‍वर देशमुख शारीरिक शिक्षक महाविद्यालयाच्‍या पटांगणात आज संकष्ट चतुर्थी,गुरुवारचे निमित्त साधून श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण झाले. यावेळी प्रसिद्ध शेफ विष्‍णू मनोहर यांनी गजानन महाराजांना 3000 किलो खिचडीचा महाप्रसाद अर्पण केला. दिवसभर सुमारे 45 हजार गजानन भक्‍तांना या महाप्रसादाचा लाभ मिळणार असल्‍याचे उदघाटनपर मार्गदर्शन करताना (Union Highways Minister Nitin Gadkari)केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

‘अन्‍न हे पुर्णब्रम्‍ह’ असे श्री गजानन महाराज नेहमी म्‍हणायचे याविषयीचे हाती फलक घेत स्वयंसेवक लक्षवेधी होते. विष्‍णू मनोहर यांनी 6 हजार किलो क्षमता असलेल्या मोठ्या कढईत ही खिचडी तयार केली. स्वतः गडकरी यांनीही यात कोथिंबीर घालत लज्जत वाढविली.तांदूळ, तूर डाळ, मूग डाळ, चना डाळ, कोबी, कांदे, गाजर, शेंगदाणे, कोथिंब‍िर, तेल, तूप, मीठ, हळद, मिरची, गरम मसाला, दही, साखर, पाणी या साहित्‍याचा वापर करून ही 3000 किलो खिचडी तयार करण्यात आली. त्‍यासाठी १० फूट व्‍यासाची, ५ फूट उंच कढई वापरली गेली. यापूर्वी देखील 3 हजार किलो खिचडी तयार केली त्यावेळी गडकरी उपस्थित होते.आतापर्यंत 72 हजार किलो अन्नधान्य यात शिजविल्याची माहिती (Vishnu Manohar)विष्णू मनोहर यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

ही तयार झालेली खिचडी प्रसाद म्‍हणून पारायणात सहभागी झालेले भक्‍तगण, तसेच, जनतेला वितरीत केली गेली. खासदार सांस्कृतिक महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रम होत असले तरी त्याला अध्यात्मिक जोड़ यावेळी देण्यात आली. नवनवीन प्रतिभाना संधी देत या महोत्सवात सामाजिक,सांस्कृतिक समतोल साधण्याचा प्रयत्न केला गेला यावर यावेळी ना गडकरी यांनी माध्यमांशी बोलताना भर दिला.