
सरकारच्या इशाऱ्यावर डोलणाऱ्या निवडणूक आयोगाचा माज उतरविण्याचे आवाहन
अमरावती AMRAWATI : भारतीय निवडणूक आयोग हा आता स्वायत्त राहिलेला नाही. म्हणून आता लोकशाही टिकवण्यासाठी लोकांनीच पुढाकार घेण्याची वेळ आली आहे. आता लोकांनी निवडणूक आयोगाला दिसेल तेथे झोडावे. असा सल्ला वंचीत बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी दिला. सध्या देशात निवडणूक आयोगाची मनमानी सुरु आहे. ते कायदा मानत नाहीत. कोर्टाच्या आदेशालाही जुमानत नाहीत. Prakash Ambedkar
सरकारच्या इशाऱ्यावर डोलणाऱ्या निवडणूक आयोगाला माज चढला असून ते संवैधानिक चौकट मोडायला निघाले आहेत. त्यामुळे स्वतःच्या संवैधानिक जवाबदारीचा विसर पडलेल्या निवडणूक आयोगाला लोकांनी मारझोड करणे हा गुन्हा नाही, निवडणूक आयोगाची स्वायत्तता व देशातील लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी आता नागरिकांनीच पुढाकार घेण्याची गरज असल्याचेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
शनिवारी प्रकाश आंबेडकर यांचे अमरावतीत आगमन झाले, यावेळी ते विश्राम भवन येथे पत्रकारांशी संवाद साधत होते. पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले कि, संविधानाने निवडणूक आयोगाला हिटलर सारखे अधिकार दिले ते यासाठी कि, देशातील निवडणुका निश्पक्ष व्हाव्या, कुणीही त्यांच्या कामात आड येऊ नये. जर कुणी आडवा आलाच तर त्याला उडवून लावता यावे, यासाठी हे सर्वाधिकार निवडणूक आयोगाला बहाल आहेत. परंतु निवडणूक आयोग मात्र सरकारच्या इशाऱ्यावर काम करीत असल्याने देशातील कित्येक निवडणूका व पोटनिवडणुका लंबीत पडल्या आहेत. लोकांच्या आपल्या पसंतीचा उमेदवार निवडण्याच्या स्वातंत्र्यावरच गदा आणल्या गेली आहे. या विरोधात सगळ्यांनी पेटून उठावे, राजकीय पक्षांनीही लोकं व लोकशाहीशी इमानदार राहावे. हा संदेशही त्यांनी यावेळी दिला. पत्रकार परिषदेला वंचीत बहुजन आघाडीचे युवक प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा, युवक आघाडी जिल्हाध्यक्ष अभिजित देशमुख, प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर,अंकुश वाकपाजर, महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्ष डॉ निशा शेडे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
जवाबदारी पाळता येत नसेल तर राजीनामे द्या
प्रत्येक सर्वसाधारण निवडणूक वेळेवर घेणे, ६ महिन्याचे आत पोटनिवडणूक घेण्याची मर्यादा पाळणे हि निवडणूक आयोगाची संवैधानिक जवाबदारीच होय. परंतु निवडणूक आयोगाला जर स्वतःची जवाबदारी पाळता येत नसेल तर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन मोकळे व्हावे. नाही तर सर्व थांबलेल्या निवडणुका तात्काळ घेण्यात याव्या हि मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली.
निवडणुकीचे चक्र थांबता कामा नये
एखादी निवडणूक जाहीर झाली तर मग देशात युद्ध जरी पेटले तरी घोषित निवडणूक रद्द करण्याचे अधिकार निवडणूक आयोगाला नाही. कुढल्याही परिस्थितीत निवडणुकीचे चक्र थांबवता येत नाही. असे असतानांही निवडणूक आयोगाने मात्र सर्व नियम धाब्यावर बसवून कित्येक निवडणुका जाणीवपूर्वक रोखून ठेवल्या आहेत. निवडणुकीचे चक्र थांबता कामा नये यासाठी निवडणूक आयोगाने त्यांचा असैवधानिक अधिकार वापरून लोकशाही हितासाठी निश्पक्ष राहून सर्व थांबलेल्या निवडणुका तात्काळ घ्याव्या याचा पुनरुच्चारही त्यांनी पत्रकारांशी बोलताना केला.