

बंगळुरू(Bangalore), 31 मे जेडीएसचे माजी नेते प्रज्वल रेवन्ना(Prajwal Revanna)तब्बल 35 दिवसांनी मायदेशी परतले आहे. महिलांच्या लैंगिक छळाचा आरोप झाल्यापासून ते विदेशात होते. बंगळुरू विमानतळावर दाखल होताच पोलिसांनी त्यांना अटक केली.
प्रज्वल रेवन्ना यांच्यावर अनेक महिलांनी लैंगिक छळ केल्याचे आरोप केले असून, दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गेल्या महिनाभरापासून प्रज्वल रेवन्ना जर्मनीमध्ये होते. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर प्रज्वल रेवन्ना परदेशात फरार झाले. रेवन्नाविरोधात पोलिसांनी नोटीस जारी केल्यानंतर रेवन्ना यांचे बचावाचे सर्व मार्ग बंद झाले. त्यानंतर गुरुवारी रात्री उशिरा रेवन्ना भारतात परतले आणि तत्काळ एअरपोर्टवरच अटक करण्यात आली. पोलिसांच्या एका पथकाने प्रज्वल रेवन्ना यांना जीपमधून सीआयडी कार्यालयात नेले. त्यानंतर रात्रभर सीआयडी कार्यालयात ठेवण्यात आले. एसआयटी टीमने रेवन्ना यांच्या 2 सुटकेसही सोबत नेल्या आहेत. प्रज्वल रेवन्ना यांना आज, शुक्रवारी वैद्यकीय चाचणीसाठी सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. त्यांना लवकरच न्यायालयात हजर केले जाणार आहे.
यासोबतच फॉरेन्सिक टीम रेवन्ना यांचे ऑडिओ सॅम्पलही घेईल. व्हायरल व्हिडिओमध्ये येणारा आवाज प्रज्वल रेवन्ना यांचा आहे का याची तपासणी केली जाणार आहे. प्रज्वल रेवन्ना यांनी 2 दिवसांपूर्वी एक व्हिडिओ संदेश जारी केला होता, ज्यामध्ये त्यांनी 31 मे रोजी एसआयटीसमोर हजर राहून तपासात सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते.