भंडारा BHNDARA : राष्ट्रवादी काँग्रेसच्या AJIT PAWAR अजित पवार गटाच्या दाव्याने भाजपच्या चिंता वाढविल्या आहेत. भाजपकडे असलेल्या विदर्भातील भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसने दावा सांगितला आहे. या मतदारसंघातून लढण्यास आपण सज्ज आहोत, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी केले आहे. राज्याच्या प्रत्येकच क्षेत्रात आम्हाला व शिंदे गटाला जागा अपेक्षित असल्याचे पटेल यांनी म्हटले असल्याने भाजपपुढे पेच निर्माण होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.
काय म्हणाले पटेल
भंडारा गोंदियावर दावा करताना प्रफु्ल्ल पटेल म्हणाले की, “भंडारा गोंदिया मतदारसंघात राष्ट्रवादी नेहमीच मजबूत राहिली आहे. भंडारा जिल्ह्यातून मी अनेक वर्ष खासदार म्हणून निवडून आलो आहे. भंडारा जिल्हा मतदारसंघ आणि माझे नाते वेगळे आहे. विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात बळकट गोंदिया-भंडारा जिल्ह्यात आहे. स्वाभाविकपणे ही जागा राष्ट्रवादीला मिळणे अपेक्षित आहे. त्यामुळे त्या जागेवर आमचा नैसर्गिक दावा राहणार आहे. माझ्या तयारीचा प्रश्न नसतो. मी सदैवच तयार असतो. विदर्भात आम्हाला जागा हव्या आहे. राज्यात प्रत्येक भागात आम्हाला आणि शिंदे गटाला जागा अपेक्षित आहे. लोकसभेचे जागा वाटप भाजपच्या नेतृत्त्वात होणार आहे. भाजपचे जास्त खासदार आमदार आहेत त्यामुळे साहजिक लोकसभेसाठी त्यांचा मोठा दावा असणार आहे.”














