सामर्थ्य आहे चळवळीचे…

0

 

भगवंताचे अधिष्ठान ठेवणार्‍या
देवी अहल्याबाई होळकर (Ahlyabai Holkar)

केवळ प्रशासन चालवता येणे म्हणजे आदर्श राज्य चालवणे नव्हे. आदर्श राज्य चालवायचे असेल तर पहिले लोक संस्कृती व राज्य संस्कृती दोन्हीही ची ओळख असणे, अभ्यास असणे व त्यांच्या समन्वयाची मनापासून इच्छा असणे गरजेच. एरवी राज्य म्हणजे केवळ प्रशासन बनते व काही मुठभर लोकांचे सुख हे सर्व प्रजेचे सुख मानले जाते.

प्रत्येकाच्या अन्न वस्त्र व निवारा या गरजा पूर्ण करणे म्हणजेच आदर्श राज्य करणे नव्हे. अन्न व निवारा या स्वतःच्या गरजा तर पशू पक्षीही पूर्ण करतात. केवळ वस्त्र ही एक गरज वाढल्याने राजाची वा राज्याची गरज भासते हे म्हणणे केवळ हास्यास्पद आहे.

प्रत्येक भौगैलिक क्षेत्राची एक विशिष्ट संस्कृती असते. तिथल्या रहिवाश्यांनी तिचे आचरण करत तिला कालोपयोगी समृद्ध केलेले असते. या संस्कृतीचे रक्षण व संवर्धन हे राजाचे खरे कार्य असते. कारण ही संस्कृती म्हणजेच त्या राज्याचा पाठीचा कणा असते. अन्न वस्त्र निवारा ही शरीराची बाह्य गरज तर संस्कृती म्हणजेच जीवनपद्धती ही तिथल्या नागरिकांची आंतरिक आवश्यकता असते.

राज्य चालवतांना ज्या ज्या राज्यकर्त्यांनी सांस्कृतिक आधार ठेवला ते ते राज्यकर्ते अमर झालेत. केवळ अन्न वस्त्र निवारा या भोवती फिरणारे राजे इतिहासात गुडुप वा नामशेष झालेत.

अध्यात्म ही आपल्या भारताची मुख्य ओळख आहे. त्यामुळे अध्यात्माची ओळख होईल असे प्रतिकं जपणे व संवर्धित करणे, म्हणजे केवळ एक पिढीचा नव्हे तर तो पिढ्यानपिढ्यांच्या सुखाचा विचार ठरतो.

विजयनगर साम्राज्य, शिव शासन काळ यांचा अभ्यास करू जाता तिथला तिथला राजा आपल्या भुमीशी एकरूप होता. आपल्या क्षेत्रातील लोक जीवनाशी म्हणजेच संस्कृतीशी एकरुप होता, हे लक्षात येते.

मध्यप्रदेशातील नर्मदेच्या उत्तर तटावरील होळकर संस्थानची राणी अहल्याबाई होळकर यांचे जीवनचरित्र आदर्श राज्यकर्त्याचे जीवनचरित्र म्हणूनच अभ्यासले जायला हवे. पण त्याऐवजी अलिकडच्या काळात राज्य निधर्मी पद्धतीने चालवण्याची व संस्कृतीला रसातळाला पोहचवण्याची स्पर्धा सुरू आहे. दुसऱ्याचे ते चांगले व आपले ते वाईट अशी अवसादी मनोवृत्ती बाळगणारे लोकच राज्यकर्ते झालेत. त्यामुळे संस्कृती अभावी अन्न वस्त्र निवारा यापैकी नेमकी कशाचीच पूर्तता राज्यकर्ते करु शकले नाही व लोक राहणीमानाचे अधःपतन सुरू आहे.

अहिल्याबाई होळकर हे व्यक्तिविशेष आज विशेषत्वाने अभ्यासले जाण्याची गरजच यासाठी आहे की एका छोट्या संस्थानाच्या त्या राज्यकर्ता असतांनाही त्यांनी आपल्या कर्तृत्वाची कक्षा संपूर्ण सांस्कृतिक भारत ठेवली होती. त्यांच्या या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेता त्या संपूर्ण हिन्दुस्तानाच्या सांस्कृतिक सम्राज्ञीच होत्या.

अगदी तारुण्याच्या उंबरठ्यावरच वयाच्या विसाव्या वर्षी पतीला समरंगाणावर वीर मरण आले. त्याकाळच्या परंपरेनुसार अहल्याबाई सती जायला निघाल्या होत्या, पण सासरे, (By Malharrao Holkar)मल्हारराव होळकरांनी त्यांच्यातील नेतृत्वगुणांची राज्य रक्षण व संवर्धनासाठी गरज पटवून दिले व त्या आपले दुःख ह्रदयातच गाडून राज्यकारभाराला लागल्या.

एका संस्थानाची राणी असल्याने त्या स्वतःसाठी कितीतरी बडेजाई करू शकल्या असत्या. पण प्रचलित काळाशी सुसंगत विधवेचे अलिप्त जीवन जगत त्यांनी राज्य कारभार पाहिला. आजही आपण मध्यप्रदेशातील महेश्वर गावी गेलात व होळकरांचा किल्ला बघितला, तर तिथले मार्गदर्शक (गाईड) त्या राजवाड्यातील एक उपेक्षित लहान खोली दाखवतील, संपूर्ण हिन्दुस्तानाच्या संस्कृतीचे संवर्धन करणारी ती राणी व्यक्तिगतरित्या अगदी १२ × २० फुटांच्या खोलीत राहायची.

तो काळ मुघली व निजामी आक्रमणाचा काळ होता. हिन्दू अस्मितेची सर्वोच्च प्रतिकं पायदळी तुडवण्याची जणू अहमहमिकाच लागलेली होती. बाबराच्या काळात अयोध्येला भ्रष्ट केले गेले होते. औरंगजेबाच्या काळात मथुरा व काशीला भ्रष्ट केले गेले होते.

अस्मिताविहीन जीवन म्हणजे कणाहीन मनुष्य, मग त्याला कितीही अन्न वस्त्र निवारा पुरवा, तो मान वर करून जगू शकत नाही.

अहल्याबाईंनी आपली वैचारिक मर्यादा केवळ होळकर संस्थानापुरती मर्यादित ठेवली नव्हती. त्यांना अखिल हिन्दू समाजाची अस्मिता जागवायची होती. आपली ढासळत चाललेली संस्कृती वाचवल्या शिवाय पुढील पिढी विजिगिषु वृत्तीची बनणार नाही, हे त्या महान धर्मप्रेमी राणीने जाणले. संस्थान लहान असल्याने व पेशव्यांसोबत समन्वयाची कमतरता असल्याने, जे काही करायचे आहे, ते आपल्यालाच करायचे आहे, याची खुणगाठ मनाशी बांधून त्या उपलब्ध साधनांसह कार्यरत झाल्यात. संस्थान छोटे असल्याने सैन्यबळ मुघलांशी दिर्घकाळ लढू शकेल असे नव्हते. त्यात राज्याच्या रहिवाशांवर कुठलाही आर्थिक बोजा न देता त्यांना हे कामं करायचे होते. त्यामुळे त्यांनी देशभरात संस्कृती संवर्धनाचे जे अतीप्रचंड कार्य केले, ते स्वतःच्या राजेशाही जीवनपद्धतीला त्यागून वाचवलेल्या खाजगी संपत्तीतूनच केले.

ढासळती हिन्दुसंस्कृती ही मंदिरांचे दर्शन व नद्यांच्या पवित्र स्नानानेच स्थिर होऊ शकेल हे त्यांनी जाणले व जागोजागी पवित्र मंदीरांचा जिर्णोद्धार व पवित्र नद्यांवर घाट बांधून लोकांनी तिथे जावे, वारंवार जावे, हे आकर्षण निर्माण केले. यासाठी तिथे धर्मशाळा ही बांधल्यात.

औरंगजेबाने काशीविश्वनाथाचे मंदीर फोडल्यावर त्यानंतर कोणीही तिथे मंदीर पुन्हा उभारण्याचा सफल प्रयत्न करू शकले नव्हते. हे काम अहल्याबाईंनी १११ वर्षांनंतर करून दाखवले. येवढेच नव्हे तर मंदिराचा गौरव व आकर्षण वाढवायला त्यांनी शिखराच्या घुमटांना सोन्याने मढवले.

अहल्यादेवींनी केवळ अयोध्या मथुरा काशीतच हे संस्कृती संवर्धनाचे काम केले नाही, तर (Badrinath)बद्रिनाथ, (Dwarka)द्वारका,(Puri) पुरी, (Gaya)गया, (Rameswaram)रामेश्वरम् , (Ujjain)उज्जैन, (Omkareshwar)ओंकारेश्वर, (Somnath)सोमनाथ, (Haridwar)हरिद्वार, (Nashik)नाशिक, (Parli Vaijnath)परळी वैजनाथ अशा असंख्य पवित्र स्थळांचा त्यांनी जिर्णोद्धार केला. केवळ मंदिरं व पवित्र नद्या संवर्धित करून त्या थांबल्या नाहीत, तर तिथे भाविक पोहचावे म्हणून त्या त्या ठिकाणांना जोडरस्तेही बांधलेत. अगदी कलकत्त्यातील भाविक काशीला दर्शनाला पोहचावा, यासाठी त्यांनी रस्ता बांधला होता.

एका छोट्या संस्थानाच्या राणीने अल्प संसाधनात उभे केलेले हे अजोड कार्य आहे. आज आम्ही केवळ ३० फुट × ५० फुट या जागेवर घर बांधू जाता, तोंडाला फेस येतो. मात्र त्याकाळी राज्य रक्षणासाठी हातात तलवार घेऊन घोडदौड करणाऱ्या, न्यायदानात व्यक्तीविशेषाची आसक्ती येऊ नये म्हणून हातात शिवलिंग घेऊन न्यायदान करणाऱ्या, राज्यातील प्रजा सुखी राहावी म्हणून औद्योगिकीकरणाला चालना देणाऱ्या, हे सर्वच कार्य आदर्शवत करणाऱ्या व याउपर आपल्या राज्याबाहेर भारताचे संस्कृती रक्षण व संवर्धन करणाऱ्या अहल्याबाईं आजच्या भाषेत किती multitasking करत असतील?

माणसाच्या मुलभुत गरजापुर्तीच्या पलिकडे माणसाचे मन स्थिर असेल, तो निर्भय स्थितीत असेल तरच आपले सामुदायिक जीवन यशस्वी होते. त्यासाठी संस्कृती बळकट असणे गरजेचे आहे. यासाठी स्वतःच्या सुख दुःखाकडे दुर्लक्ष करून मी भगवंताचे कार्य करत आहे , हा भाव कायम मनात ठेवत आदर्श राज्य करणाऱ्या व अखिल हिन्दुस्थानात संस्कृती संवर्धन करण्याचे कार्य करणाऱ्या अहल्यादेवी संपूर्ण जगातील अखिल स्त्रियांच्या अग्रणी ठरतात. संपूर्ण जगातील स्त्री नेतृत्वाचा अभ्यास करणाऱ्यांनी अहल्यादेवींचा अभ्यास करूनच इतरांचे मुल्यमापन करावे, इतके कार्य अहल्यादेवींनी आपल्या संघर्षमय आयुष्यात केलेले आहे.

भारतीय सौर तारखेनुसार आज त्यांचा जन्मदिवस! या कर्तृत्वशालिनी राणीला माझे दंडवत अभिवादन!

(Kishore Paunikar Narmadapurkar, Nagpur)किशोर पौनीकर नर्मदापुरकर, नागपूर
फोन : 9850352424