
लोकसभा निवडणूक
ठाणे(Thane): लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 85 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिक मतदारांना व 40 टक्क्यांहून अधिक अपंगत्व असणाऱ्या दिव्यांग मतदारांना टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची सुविधा देण्यात आली आहे. ही सुविधा ऐच्छिक आहे, अशी माहिती माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली आहे.
मतदारयादीमध्ये ज्या मतदारांचे वय 85 वर्षे पेक्षा जास्त आहे, ज्या मतदारांची नोंद दिव्यांग अशी करण्यात आली आहे, अशा मतदारांना ही सुविधा मिळणार आहे. दिव्यांग मतदारांच्या बाबतीत मतदाराचे अपंगत्व 40 टक्क्यापेक्षा जास्त आहे, असा सक्षम प्राधिकारी यांचा दाखला असणे आवश्यक आहे. मतदान केंद्रनिहाय अशा मतदारांना मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत नमुना 12 ड चे वाटप घरोघरी करण्यात येत आहे. या नमुन्यामध्ये अर्ज करणाऱ्या मतदाराला त्यांच्या घरी टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल. नमुना 12 ड मध्ये आवश्यक सर्व माहिती भरुन ती मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत दि.16 मार्च 2024 रोजी आचारसंहिता घोषित झाल्यापासून हा फॉर्म 12 ड चे वितरण सुरु आहे. दि.17 एप्रिल 2024 पर्यंत तो आपल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत संबंधित सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जमा करावा. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी या कालावधीत हा नमुना 12 ड मधील अर्ज स्वीकारण्यासाठी या मतदारांना घरोघरी भेट देत आहेत.

















