ठाणे जिल्ह्यात सरकारी खर्चातून १०० जणांना पोलिस संरक्षण-अजित पवार

0

ठाणे- ठाणे जिल्ह्यातील सुमारे १०० जणांना सरकारी खर्चातून पोलिस संरक्षण दिले असल्याचा दावा राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. यासंदर्भात अधिक माहिती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. मी माहिती अधिकारातून माहिती घेऊ शकतो. विरोधी पक्ष नेता म्हणूनही माहिती मागण्याचा अधिकार मला आहे. परंतु, माहिती गुप्त राहते असा काही भाग नाही. गेले वर्षभर मी ठाणे जिल्ह्यात संरक्षण घेणारे कोण कोण याची माहिती मागतोय. पण याची माहिती दिली जात नाहीय. ठाणे जिल्ह्यात असे काय घडले की इतक्या लोकांना संरक्षण दिले जात आहे?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

अजित पवार म्हणाले की, आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी यांच्या जीवाला भिती असेल तर त्यांना संरक्षण देण्याचे काम आहे. परंतु, तुम्ही १०० लोकांना संरक्षण देताय तर त्याचा खर्च शासनावर पडतो. माझ्याकडे असलेल्या १०० जणांच्या यादीमध्ये काही व्यावसायिक आहेत. या व्यावसायिकांना सरकारी खर्चाने संरक्षण देण्याची गरज नाही. सर्वसामान्य माणसांचा जीव धोक्यात आला तर त्याला संरक्षण देण्यास माझा आक्षेप नाही.