

विदर्भ साहित्य संघात पार पडले गोमंतकीय कवयित्रींचे काव्यवाचन
नागपूर:-“महिला नेहमीच नातेवाईकांना, आप्तजनांना जोडण्याचे काम करतात. त्यांना ती कला अवगत असते. त्याचवेळी समाजालाही जोडून ठेवणे तिच्या हातात आहे. कवयित्रींनी या समाजाचे खरे चित्र आपल्या कवितांमधून मांडायला हवे, समाजाला जागृत करायला हवे” असे प्रतिपादन ज्येष्ठ कवयित्री -साहित्यिक आशा पांडे यांनी केले.
विदर्भ साहित्य संघ नागपूर, ग्रंथसहवास तर्फे आयोजित “रसास्वाद गोमंतकीय काव्याचा” हा कार्यक्रम नुकताच पार पडला. त्यावेळी काव्यवाचन कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून त्या बोलत होत्या. स्त्रीचे समाजातील स्थान, तिचा उच्चार आणि उद्गार यावर त्यांनी आपली मते सविस्तर मांडत जागतिक महिला दिन स्त्रियांनी नव्हे तर पुरुषांनी साजरा करायला हवा असेही मत व्यक्त केले.
गोव्याच्या मातीचा सुगंध असणाऱ्या “रसास्वाद गोमंतकीय काव्याचा” या काव्यवाचन कार्यक्रमात कवयित्री चित्रा क्षीरसागर , पौर्णिमा केरकर , दीपा मीरिंगकर आणि रजनी रायकर या खास गोव्याहून आलेल्या होत्या. चित्रा क्षीरसागर यांनी ‘आजच्या काळातील मुली’ या कवितेतून आजच्या काळात मुलींचं बालपण आणि भावविश्व कसे बदलेले आहे अत्यंत संवेदनशीलतेने मांडले. रजनी रायकर ह्यांनी आपल्या कवितांमधून गोव्याची संस्कृती आणि सण यांचे वर्णन करत ‘धालो’ या गोव्यातील फुगडीसारख्या खेळाचे सांस्कृतिक महत्त्व विशद केले तसे गोव्यातील निसर्गाचेही सुंदर वर्णन केले. ‘किनारा वाट पाहतो आहे’ या कवितेते गोव्यातील समुद्र दर्शवला. दीपा मिरिंगकर ह्यांनी ‘साखळी टाका” या कवितेतून आजीकडून भरतकाम शिकताना माणसे जोडण्याचे कसब आणि वारसा कसा मिळाला आणि स्त्री तो कसा पार पाडते आहे याविषयी मांडणी केली आणि सोबतच ‘रंगरेषा’ ही कविताही सादर केली. पौर्णिमा केरकर ह्यांनी “आमचा पाऊस” या कवितेतून पाऊस कशी स्वप्न देतो, मनात रुजतो, अंकुरतो, फुलतो हे अतिशय कमी शब्दात सुंदररीत्या मांडले. थोडे गात, थोडे वाचत अनोख्या पद्धतीने त्यांनी कविता सादर केली. या गोमंतकीय कवयित्रींबरोबरच नागपूरच्या बहुभाषक कवयित्री नेहा भांडारकर यांनी आणि धनश्री पाटील यांनी सुद्धा कविता वाचन केले.
“गोव्यातील कवितांचा परिमळ विदर्भ साहित्य संघात दरवळला ही सुखावणारी बाब असून अशा कार्यक्रमांद्वारे साहित्यिक आदान-प्रदान होणे गरजेचे आहे,” असे मत विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते ह्यांनी व्यक्त केले. ग्रंथ सहवासचे संचालक प्रा. विवेक अलोणी यांच्या सहकार्यानेपार पडलेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वृषाली देशपांडे यांनी केले , तर सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन धनश्री पाटील यांनी केले.