पोद्दारेश्वर राम मंदिरातर्फे रविवारी भव्य श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा

0

– 90 हून अधिक चित्ररथांचा सहभाग
– संपूर्ण मार्ग व्यवस्था अंतिम टप्प्यात

नागपूर (Nagpur), 4 एप्रिल
प्रभूरामचंद्राच्या जन्मोत्सवानिमित्त नागपुरात पोद्दारेश्वर राम मंदिरात आयोजित होणारी श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा रविवारी आयोजित करण्यात आली असल्याची माहिती एका पत्रपरिषदेत मंदिराचे प्रबंधक ट्रस्टी पुनीत पोद्दार यांनी दिली.
रविवारी दुपारी 4 वा. मंदिरातील उत्सवमूर्ती प्रमुख रथात विराजमान होतील. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, पोलिस आयुक्त रवींद्रकुमार सिंघल, निगमायुक्त व सर्वपक्षीय आमदारांच्या हस्ते श्रीराम पंचायतनाचे पूजन होऊन शोभायात्रेस प्रारंभ होईल. शोभायात्रेत स्केटींग पथक, प्रतिहारी दल, अश्वमेधाचा घोडा,शंखनाद दल, भजन मंडळी, नटराज क्रिडा मंडळाचे आदिवासी नृत्य, रामायण मंडळ, राम संकीर्तन दल, जस गायन आदींसह , बांकेबिहारी दर्शन, महालक्ष्मी जगदंबा कोराडी दर्शन, पंचमुखी हनुमान, रोकडे ज्वेलर्स तर्फे बैद्यनाथ ज्योतिर्लींग दर्शन, केदारनाथ धाम, महाकाली दर्शन, स्वामी समर्थ दर्शन, बालाजी दर्शन, कुंभकर्ण निद्रा, बैद्यनाथ तर्फे विष्णू अवतार, राधाकृष्ण सिंहासन, प्रयागराज महाकुंभ, वाल्मिकी रामायण रचना, शिवपार्वती विवाह, महर्षी सुदर्शन यांची आराधना, मारीच वध, तुळजा भवानी गोंधळ, महाकाल दर्शन, राम पंचायतन सजीव झांकी, गौमाता राजमाता दर्शन, नरसिंह अवतार, तुलसी रामायण कथा, भक्तीलीन हनुमान हे प्रमुख 90 चित्ररथ राहणार आहेत.
शोभायात्रेच्या व्यवस्थेसाठी संपूर्ण मार्गावर स्वागतद्वार, कमानी, रामायणातील देखावे, दिव्यांची रोषणाई, संपूर्ण मार्गावर शोभायात्रेचे समालोचन राहणार आहे. ही शोभायात्रा पोद्दारेश्वर राम मंदिर, हंसापुरी, बजेरीया, गोळीबार चौक, मार्गे इतवारी, सराफा बाजार, चितारओळ, बडकस चौक, केळीबाग रोड, शिवाजी चौक, टिळक पुतळा, शुक्रवारी तलाव, कॉटनमार्केट चौक, लोखंडी पुल, आनंद टॉकिज, मुंजे चौक, झांशी राणी चौक, व्हेरायटी चौक, मानस चौक मार्गे पुन्हा मंदिरात परतणार आहे.

शोभायात्रेच्या मार्गात भाविकांसाठी विविध संस्था व संघटनांनी चना पोहा, मसाला चना, आइसस्क्रीम, ताक, थंड पाणी, सरबत, बुंदी, पंजिरी प्रसाद, हलवा, फळ वाटप, मिठाई, आलुपोहा आदींचे वितरण करण्यात येणार आहे. मंदिरातर्फे देखील शोभायात्रेत प्रसाद वितरण करण्यात येणार आहे.

शोभायात्रेसह राहणार्‍या विशेष वाहनात माजी महापौर दयाशंकर तिवारी, डॉ. वंदना खुशलानी, महेश तिवारी आदी तर्फे रनिंग कॉमेंट्री करण्यात येणार आहे.

रामजन्मोत्सव शोभायात्रा दुपारी 4 वा. प्रारंभ होईल त्यानंतर ती इतवारी शहीद चौकात 6 वा. महाल येथे सायं. 7.30 वा., कॉटन मार्केट येथे रात्री 9 वा. व सीताबर्डी येथे रात्री 10 वा. पोहोचण्याची शक्यता आहे.