

मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी केले ना. मुनगंटीवार यांचे कौतुक
चंद्रपूर (Chandrapur) दि.०२ Aug :- ज्याठिकाणी औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, त्या आग्रा येथील दिवाण-ए-खासमध्ये महाराजांचा शिवजयंती साजरी करण्यासाठी दरवर्षी परवानगी घेण्याची गरज पडू नये. केंद्रीय पुरातत्व विभागाने राज्य सरकारसोबत एक सामंजस्य करार करून कायमस्वरुपी परवानगी देण्याची सोय करावी, असा प्रस्ताव राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य मंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी ठेवला. त्यावर मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे आणि केंद्र सरकारच्या पुरातत्व विभागाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचा जागतिक वारसा यादीत समावेश करण्याच्या प्रस्तावावर काल गुरूवारी सायंकाळी भारताचे संयुक्त राष्ट्र संघातील राजदूत आणि युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीचे प्रमुख विशाल शर्मा यांच्यासोबत मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत सविस्तर आणि सकारात्मक चर्चा झाली. यावेळी ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांची उपस्थिती होती. तसेच मंत्री मंगलप्रभात लोढा, सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, भारतीय पुरातत्व खात्याचे अतिरिक्त महासंचालक जान्विज शर्मा, भारतीय पुरातत्व खात्याच्या क्षेत्रीय संचालक डॉ. टी. श्रीलक्ष्मी, अधिक्षक शुभी मुजुमदार, राज्याचे पुरातत्व संचालनालयाचे संचालक सुजीतकुमार उगले आणि इतर केंद्रीय व राज्य प्रशासनातील वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत ना. श्री. सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी आग्रा येथील दिवाण-ए-खास येथे दरवर्षी शिवजयंती साजरी करणार असल्याचे सांगितले. परंतु, त्याचवेळी याठिकाणी उत्सव साजरा करण्यासाठी दरवर्षी केंद्रीय पुरातत्व विभागाची परवानगीही घ्यावी लागते हा मुद्दा उपस्थित केला. केंद्र व राज्य सरकारच्या पुरातत्व विभागाने एक सामंजस्य करार करून या उत्सवासाठी कायमस्वरुपी परवानगीचा निर्णय घेतल्यास ही समस्या सुटू शकते. दरवर्षी केंद्र व राज्य सरकार एकत्रीतपणे आग्रा येथील दिवाण-ए-खास येथे शिवजयंती उत्सव साजरा करेल, असेही त्यांनी म्हटले. ना. श्री. मुनगंटीवार यांच्या या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांसह केंद्र व राज्याच्या पुरातत्व विभागातील अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. लवकरच यासंदर्भात पुढील पाऊल उचलण्याचा येणार आहे.
या बैठकीत छत्रपती शिवाजी महाराजांचे (Chhatrapati Shivaji Maharaj) १२ प्रमुख किल्ले जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यासाठी युनेस्कोकडे पाठविण्यात आलेल्या प्रस्तावाची सद्यस्थिती व पुढील कार्यवाही यासंदर्भात विशाल शर्मा यांनी सविस्तर माहिती दिली. छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले जागतिक वारसा यादीत समाविष्ट होणे हा भारतीय संस्कृतीचा गौरव असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले.
सुधीरभाऊ सर्वांत सक्रीय मंत्री – मुख्यमंत्री
‘सुधीरभाऊ मुनगंटीवार राज्यातील सर्वांत सक्रीय मंत्र्यांपैकी एक आहेत. ते एखादे काम हाती घेतात तेव्हा चिकाटीने आणि जिद्दीने पूर्णत्वास नेतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास जगभरात पोहोचविण्यासाठी जे काम ते करीत आहेत, ते कौतुकास्पद आहे. मी मुख्यमंत्री म्हणून त्यांच्यासोबत कायम आहे आणि राहील,’ या शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ना. श्री. मुनगंटीवार यांचे कौतुक केले. आग्रा येथील दिवाण-ए-खासमध्ये औरंगजेबाने महाराजांचा अपमान केला त्याठिकाणी सुधीरभाऊंनी राज्याभिषेक सोहळा साजरा केला, याचा अभिमान आहे. आता याचठिकाणी दरवर्षी शिवजयंती साजरी करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.