

नागपूर (Nagpur)- आज यवतमाळ येथे आमचे मविआचे उमेदवार संजय देशमुख यांचा फॉर्म भरायला आलो. महायुतीचा उमेदवार अजून तिथे ठरलेला नाही. भ्रष्ट उमेदवार देणार की कोणी नवीन चेहरा येणार? हे अजून स्पष्ट झालेले नाही मात्र जनता आमच्याच सोबत असल्याचा दावा माजी मंत्री शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी केला. ते बंडखोर नाहीत गद्दार आहेत. बंडखोर आणि गद्दारीमध्ये फार फरक असतो, आजवर जिथे गद्दारी झाली तेथे लोकांनी त्यांना नाकारले. केंद्रात आणि राज्यात भाजपच्या सरकारच्या काळात मागील दहा वर्षांत जी कामे व्हायला पाहिजे होती ती झाली नाहीत.कालच एप्रिल फुल झाला आहे.
जगात एप्रिल फुल डे साजरा होतो, आपल्याकडे तो अच्छे दिन म्हणून साजरा होतो.परिवर्तनाचे वारे सगळीकडे वाहायला सुरूवात झाली आहे. दिल्ली, बिहार, झारखंड, बंगाल, महाराष्ट्र सगळीकडे इंडिया आघाडीची बांधणी मजबूत होत आहे. आम्ही थेट जनतेच्या संपर्कात आहोत आणि जनता आमच्या संपर्कात आहे.या देशात लोकशाही संपत चालली आहे – संविधानाला मोठा धोका आहे . अशा काळात आम्ही सगळे एकत्र येऊन जे लोकशाही, संविधान संपवतात त्यांच्याविरुद्ध लढत आहोत.
ज्यांना कोणाला लोकशाही संविधान वाचवायचे आहे ते आमच्या सोबत राहतील असे आदित्य ठाकरे, म्हणाले. महाविकास आघाडीकडून यवतमाळ पोस्टल ग्राउंड येथे नामांकन दाखल करण्यासाठी शक्तीप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून नामांकन दाखल करण्यासाठी आदित्य ठाकरे व शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यवतमाळ येथे दाखल झाले आहेत.