अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत ही जनतेची इच्छा-छगन भुजबळ

0

कर्जत- अजित पवार मुख्यमंत्री व्हावे, ही जनतेची इच्छा असून आपल्याच दुसऱ्या गटाचे नेते साध्या शुभेच्छा देण्यासही तयार नाहीत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्या गटावर केली आहे. कर्जतमध्ये आयोजित करण्यात आलेल्या अजित पवार गटाच्या अधिवेशनाचा दुसऱ्या दिवशी त्यांनी ही भूमिका मांडली. (Chhgan Bhujbal in NCP Convention)
या अधिवेशनात अजित पवार गटातील नेत्यांनी शरद पवार गटावर बरीच टीका केली. विशेष म्हणजे अनेक नेत्यांनी शरद पवारांच्या कार्यपद्धतीवरही टीकाटिप्पणी केली. आज भुजबळ यांनी अजित पवार यांना पाठिंबा देण्यामागील भूमिका स्पष्ट केली. ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेने आपला निर्णय योग्य असल्याचे दाखवून दिले असल्याचा दावाही भुजबळ यांनी केला आहे. बीडमध्ये मराठा आंदोलनावेळी जाळपोळ करण्यात आली. त्यावेळी दगडफेक करण्याची काय गरज होती? गावठी पिस्तुलाची काय गरज होती? मला या विषयावर आता बोलायचे नव्हते. पण आमदारांच्या घरांची जाळपोळ करण्यामागे कोणाचे कारस्थान आहे, हे शोधून काढण्याची गरज आहे, हे मी अजितदादांना सांगू इच्छितो, असे छगन भुजबळ म्हणाले. जे काही प्रश्न असतील ते एकत्र बसून सोडवा. कायदा हातात घेऊन काही करु नका. सरकारला वेठीला धरताना तुम्ही जनतेलाही वेठीला धरता, हे लक्षात घ्या. राज्यकर्ता हा सगळ्यांचा असतो, एका समाजाचा नसतो. आम्ही शिवसेनेत असल्यापासून कधीही जातीयवाद केला नाही. राज्यकर्ता हा समाजातील लहान-मोठे, अल्पसंख्याक, अशा सगळ्यांचा असतो. सगळ्यांना समान न्याय मिळाला पाहिजे, असे छगन भुजबळ यांनी सांगितले.
अधिवेशनाचा दुसरा दिवस असल्याने आजच्या समारोपाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. कार्यक्रमाच्या समारोपात राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.