

-जयंत माईणकर, मुंबई
नवे संसद भवन, सेंगोल, पूजाअर्चा इत्यादी सोपस्कार करून सुरू झालेल्या संसदेवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था असताना बरोबर बावीस वर्षांनी दुसऱ्यांदा घडलेली हल्ल्याची घटना मनात अनेक प्रश्न, शंका उत्पन्न करणारी आहे.
शंकेची पाल चुकचुकण्याची सुरुवात होते ते या हल्लेखोरांना प्रेक्षक गॅलरीचे पासेस कर्नाटकचे भाजपचे मैसुरचे खासदार प्रताप सिम्हा यांनी दिले होते. गॅलरीतून उडी मारणाऱ्या व्यक्तींच्या बुटातून धूर निघणे ही फार गंभीर बाब आहे. हाच धूर विषारी असता, किंवा या दोन उडी मारणाऱ्या व्यक्तींच्या हातात बॉम्ब किंवा स्वयंचलित हत्यार असतं तर भयावह प्रकार घडू शकला असता. कमरेवर हात ठेवून अतिरेक्यांना जागा दाखवू असं म्हणणारे गृहमंत्री अमित शाह यांनी सुरक्षा व्यवस्थेतील या ढिलाईची संपूर्ण जबाबदारी घेऊन कारवाई केली पाहिजे. भाजप खासदाराने गॅलरी पास देण्याऐवजी इंडिया आघाडीच्या खासदारांनी आणि त्यातही मुस्लिम खासदारांनी हे पासेस दिले असते तर आत्तापर्यंत देशद्रोही म्हणून सत्ताधारी भाजपने
त्यांची काय वाट लावली असती याची कल्पनाही करवत नाही.
यापूर्वी जैश ए महंमद च्या पाच आत्मघातकी अतिरेक्यांनी सशस्त्र हल्ला केला होता. ती घटना बावीस वर्षांपूर्वीची.
दहशतवाद्यांनी संसदेवर केलेल्या या हल्ल्यावेळी संसदेत हिवाळी अधिवेशन सुरू होतं. त्यामुळे तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि विरोधी पक्षनेत्या सोनिया गांधी यांच्यासह अनेक खासदार या ठिकाणी उपस्थित राहणार होते.
हल्ल्याच्या काही मिनिटांपूर्वीच तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि विरोधी पक्षनेत्या सोनिया गांधी संसदेच्या बाहेर पडल्या होत्या. परंतु उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, भाजप नेते प्रमोद महाजन सेंट्रल हॉल आणि परिसरात होते.
सर्वांना तात्काळ संसदेतील एका गुप्तस्थळी नेण्यात आले. दरम्यान, संसदेवर हल्ला करून सर्व खासदार आणि मंत्र्यांना ओलीस ठेवण्याची दहशतवाद्यांची योजना होती. परंतु जवानांच्या सतर्कतेमुळे दहशतवाद्यांचा हा कट उधळून लावला गेला.
सुरक्षा दलांनी त्या पाचही दहशतवाद्यांना ठार केलं. या हल्ल्यात दिल्ली पोलीसांचे पाच जवान, सीआरपीएफची एक महिला कॉन्स्टेबल आणि संसदेचे दोन गार्ड शहीद झाले.
बावीस वर्षांनी सुरक्षा व्यवस्थेत अक्षम्य दिरंगाई होऊन हा दुसरा हल्ला झाला आहे. प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उडी मारणे हे भारतीय संसदेला नवीन नाही. माजी केंद्रीय मंत्री आणि माजी महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष बबनराव ढाकणे यांनीही एकदा प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उडी मारली होती. अर्थात त्याचा फायदा त्यांना पुढील निवडणुकीत मिळाला आणि बबनराव आमदार झाले. तर महाराष्ट्र विधानसभा गृहात एक सामान्य व्यक्ती येऊन बसण्याची घटनाही घडलेली आहे. इतकेच नव्हे तर रात्रीच्या मुंबईमुळे फेमस झालेले स्व. प्रमोद नवलकर चक्क पिस्तूल घेऊन सभागृहात आले होते.त्यांचं चेकिंग न केल्याबद्दल एका इन्स्पेक्टरला पंधरा दिवसांसाठी निलंबित करण्यात आले होते.
पत्रकारितेत १९८८साली आल्यापासून आल्यापासून मी सतत महाराष्ट्र , गुजरात आणि मध्य प्रदेश या तीन राज्यातील विधानसभांचा अनुभव घेतला आहे. सुरक्षा व्यवस्था प्रत्येक ठिकाणी असते. पण प्रत्येक सुरक्षा व्यवस्थेत ढिलाई दिसतेच. आणि हीच ढिलाई मोठ्या संकटाकडे नेऊ शकते.
पत्रकारांचे पासेस वारंवार चेक करणाऱ्या सुरक्षा व्यवस्थेच्या हातून अशा चुका घडतात कशा हा प्रश्न आहे.
फिजी देशाचे माजी पंतप्रधान महेंद्र चौधरी यांना त्यांच्या मंत्रिमंडळ सदस्यांसह जॉर्ज स्पेट या बंडखोर व्यक्तीने ५६ दिवस ओलीस ठेऊन घेतले होते. काहीसा हाच विचार २००१ साली हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांचा होता. अशा प्रकारे संसदेत घुसखोरी करणाऱ्या व्यक्तींकडून अशा प्रकारचं कृत्य घडणारच नाही याची शाश्वती नाही.
आता हल्ला करणारे युवक सरकारच्या विरोधात रोष व्यक्त करण्यासाठी घुसले. या प्रकरणात पाच जणांना अटक करण्यात आली आहे. सहावा आरोपी फरार आहे. लोकसभेत प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उडी मारणारा आरोपी सागर शर्मा हा लखनऊचा तर मनोरंजन हा कर्नाटकातील बेंगळुरूचा आहे. तसेच संसदेबाहेर अटक करण्यात आलेली महिला नीलम ही हरियाणाच्या जिंद येथील रहिवासी आहेत. २५ वर्षीय अमोल शिंदे हा महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. हे चौघेही आरोपी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात आले. एक ते दीड वर्षांपासून ते एकमेकांच्या संपर्कात होते. त्यांनी फेकबुकवर भगतसिंग नावाचा ग्रुप तयार केला होता.
संशयित आरोपीपैकी चार जण एक ते दीड वर्षांपूर्वी फेसबुकवर एकमेकांना भेटले. त्यांनी भगतसिंग नावाचा ग्रुप तयार केला. त्या माध्यमातून ते एकामेकांच्या संपर्कात राहत होते. त्यांचे विचार एकमेकांशी जुळले होते. या प्रकरणात पाचवा आरोपी विकी शर्मा याला पोलिसांनी अटक केली आहे. पण सहावा आरोपी ललित झा अजूनही फरार आहे. मनोरंजन, सागर शर्मा, नीलम आझाद आणि अमोल शिंदे हे 3 दिवसांपूर्वी दिल्लीत आले. वेगवेगळ्या वेळेत ते दिल्लीत दाखल झाले.
मनोरंजन, सागर शर्मा, नीलम आझाद आणि अमोल शिंदे यांनी केंद्र सरकारने मणिपूर घटना, शेतकरी आंदोलन, महागाई याबाबत घेतलेली भूमिका पटली नाही. यामुळे त्यांनी संसदेत घुसण्याचा निर्णय घेतल्याची माहिती त्यांची चौकशी करणाऱ्या यंत्रणेकडून देण्यात आली.
सुरक्षा व्यवस्थेच्या निद्रिस्तेमुळेच ही चार मंडळी संसदेत घुसू शकली व्यवस्थेमधील दिरंगाई आणि आलेला ढिलेपणा हाच लसावी या घटनेचा काढता येईल
या घटनेनंतर अर्थात सुरक्षा व्यवस्था अधिकच कडक करण्यात येईल आणि त्याचा फटका पत्रकारांना आणि प्रेक्षक गॅलरीत येऊन विधिमंडळ , संसद भवन पद्धतीचा अभ्यास करणाऱ्या व्यक्तींवर होऊ शकतो
या घटनांचा फायदा घेऊन यांच्या येण्याजाण्यावरही मोठ्या मर्यादा येऊ शकते. नऊ वर्षात एकदाही पत्रकार परिषद न घेणाऱ्या आणि एकाही परदेश दौऱ्यात पत्रकारांना न नेणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यात काहीही घडू शकतं. कम्युनिस्ट उत्तर कोरिया मध्ये सरकारच्या वतीने दिलं जाणारं निवेदन ऑडिओ, व्हिडिओ क्लिप्स च्या रुपाने पत्रकरांना दिलं जातं. सुरक्षेच्या कारणास्तव अशाच प्रकारची बंधने लोकशाहीवादी भारतात येऊ नये हीच अपेक्षा. नाहीतर पत्रकारांची गॅलरीच संपुष्टात येईल.