पांढरी खानापूर प्रवेशद्वार, तीन दिवसांपासून आंदोलन सुरूच

0

 

अमरावती (Amravti)- अमरावती जिल्ह्याच्या अंजनगाव सुजी तालुक्यातील पांढरी खानापूर येथील प्रवेशद्वाराला छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी गाव सोडून अमरावतीच्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर गेल्या तीन दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. या प्रवेशद्वार प्रकरणी काल पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे दौऱ्यावर आले असताना तोडगा काढला. पण जोपर्यंत लेखी पत्र मिळणार नाही तोपर्यंत इथून जाणार नाही, अशी भूमिका पांढरी खानापूर येथील बांधवांनी घेतली. पांढरी खानापूर येथील हजारो बौद्ध समाजाचे लोकं विभागीय आयुक्त कार्यालयासमोर तीन दिवसांपासून आंदोलन करत आहेत.

बांधकामाची परवानगी मिळत नाही तोपर्यंत इथून उठणार अशी भूमिका घेतली आहे. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पांढरी खानापूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचे प्रवेशद्वार लावण्यावरून दोन गट आमने-सामने आल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. गावात संचारबंदी लावण्यात आली, तरीही बौद्ध समाजाच्या हजारो लोकांनी आयुक्त कार्यालय गाठले. अमरावती विभागीय आयुक्त यांच्याशी चर्चा झाली त्यात आयुक्तांनी तीन दिवसांचा वेळ मागितला.

अखेर काल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दोन्ही गटातील शिष्टमंडळासोबत बैठक घेऊन प्रवेशद्वारावर दोन महापुरुषांचे नाव देण्याच्या सूचना केल्या आहेत. या सूचना बौद्ध समाजाला मान्य आहेत, पण पालकमंत्री यांच्या सुचनेवर अजूनही जिल्हा प्रशासनाने लेखी पत्र दिले नाही. जोपर्यंत पत्र मिळणार नाही तोपर्यंत इथून जाणार नाही, अशी प्रतिक्रिया आंदोलकांनी व्यक्त केली आहे.