Baglihar Dam : भारताचा पाकिस्तानवर वॉटर स्ट्राईक, बागलीहार धरणातून अडवले पाणी

0

India-Pakistan Tension : पाकिस्तानच्या दहशतवादाला भारत आता वेगवेगळ्या माध्यमातून उत्तर देत असून सिंधू्च्या उपनद्यांवर असलेल्या प्रकल्पातून पाण्याची अडवणूक करण्यात येत आहे.

नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारताने पाकिस्तानला त्याची जागा दाखवण्यासाठी सर्व बाजूंनी मुस्कटदाबी सुरू केली आहे. सिंधू पाणी वाटप करार (Indus Waters Treaty) रद्द केल्यानंतर वुलर सरोवराचे पाणीही पाकिस्तानसाठी बंद केले. आता त्यापुढे जाऊन चिनाब नदीवर (Chenab River) असलेल्या बागलीहार प्रकल्पाचे पाणी (Baglihar Dam) अडवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा पाकिस्तानसाठी आणखी एक धक्का असल्याचं सांगितलं जातंय.

जम्मू-कश्मीरमधील बागलीहार जलविद्युत प्रकल्प पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानमधील वादाचा केंद्रबिंदू ठरला आहे. भारताने सिंधू पाणी वाटप करार रद्द केल्यानंतर आता चिनाब नदीचे पाणी बागलीहार धरणाद्वारे रोखण्याचा निर्णय घेतला आहे.

बागलीहार धरणातून पाणी अडवले

भारताने जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर ही कारवाई केली आहे. या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर भारताने 1960 पासून सुरू असलेली आणि जागतिक बँकेच्या मध्यस्थतेत झालेली सिंधू पाणी वाटप करार रद्द केला आहे.

जम्मूच्या रामबनमध्ये असलेल्या बागलीहार प्रकल्पातील पाण्याचे वहन नियंत्रित करण्याची भारताकडे क्षमता आहे. तसंच, झेलम नदीवर असलेल्या किशनगंगा प्रकल्पासंदर्भातही (Kishanganga Dam on the Jhelum River) भारत लवकरच कडक निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

Baglihar Dam : बागलीहार प्रकल्पावरून दीर्घकालीन वाद

बागलीहार धरण हा भारत आणि पाकिस्तानमधील अनेक वर्षांपासूनचा वादाचा मुद्दा आहे. पाकिस्तानने यापूर्वीही याबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेषत: जागतिक बँकेकडे मध्यस्थतेची मागणी केली होती. त्याचप्रमाणे, किशनगंगा प्रकल्पामुळे नीलम (झेलमची उपनदी) नदीच्या प्रवाहावर होणाऱ्या परिणामांविषयीही पाकिस्तानने आक्षेप नोंदवले आहेत.

सिंधू पाणी वाटप कराराचा इतिहास

सिंधू पाणी वाटप करार 1960 मध्ये भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे राष्ट्रपती अयुब खान यांच्या पुढाकाराने करण्यात आला होता. या करारानुसार, रावी, बियास आणि सतलज नद्यांच्या पाण्याचे अधिकार भारताच्या नियंत्रणात देण्यात आले. तर सिंधू, चिनाब व झेलम नद्या पाकिस्तानच्या नियंत्रणात राहिल्या. मात्र भारताला काही मर्यादित प्रमाणात सिंचन, वीज निर्मिती आणि घरगुती वापरासाठी पाण्याचा वापर करण्याची मुभा देण्यात आली होती.

Indus Waters Treaty : पाकिस्तानसाठी सिंधूचे महत्त्व

पाकिस्तानची कृषीप्रधान अर्थव्यवस्था मुख्यत्वे सिंधू नदी प्रणालीवर अवलंबून आहे. पाकिस्तान आपल्या पाण्याच्या 93 टक्के गरजा या पाश्चिमेकडील नद्यांमधून पूर्ण करतो. देशातील सुमारे 80 टक्के शेती सिंधू प्रणालीच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे भारताकडून सिंधू पाणी वाटप करार रद्द करण्याचा इशारा मिळाल्यानंतर पाकिस्तानमधील राजकीय आणि लष्करी पातळीवर अस्वस्थता, संताप व्यक्त होत आहे.