

पद्मश्री डॉ. विलास डांगरे…..
नागपुरातील सुरेंद्र नगर परिसरात साधा दोन खोल्यांचा दवाखाना. पण पहाटे पासूनच इथे रांग लागते. डाॅक्टर आले की त्यांच्या हातून उपचार करुन घेता यावेत म्हणून सर्वांची धडपड सुरू होते. गेली अनेक वर्षे हा दिनक्रम सुरू आहे. मध्यंतरीच्या एका प्रसंगामुळे डॉक्टरांची दृष्टी बाधित झाली. पण त्याने जनसेवेच्या त्यांच्या व्रतात जराही बाधा आली नाही. ते आजतागायत तसेच सुरू आहे. अव्याहतपणे…. सर्वसामान्यांच्या मनातला विश्वास हेच डॉक्टर विलास डांगरे यांच्या यशाचं गमक आहे.
बाळासाहेब ठाकरेंपासून तर लालकृष्ण अडवाणींपर्यंत अनेक मान्यवरांनी आजवर त्यांच्याकडून उपचार घेतलेत. पण, शेकडो सामान्यजनांचे लाभलेले आशीर्वाद त्यांना यशोशिखरावर घेऊन गेले आहेत. साधारणपणे अकरा वर्षापूर्वीचा प्रसंग असेल. डॉक्टरांच्या षष्ट्यब्दिपूर्ती समारंभाचे आयोजन नागपूरच्या देशपांडे सभागृहात करण्यात आले होते. सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी त्यांच्या भाषणातून केलेला डाॅक्टर विलास डांगरे नामक एका साधकांचा केलेला गौरव शब्दातीत ठरावा असाच होता.
मनुष्यत्व, मुमुक्षत्व आणि महापुरुषांचे सान्निध्य केवळ परमेश्वर कृपेनेच साध्य होते. डॉ. विलास डांगरे हे असेच अलौकिकत्व प्राप्त केलेले व्यक्ती आहेत. त्यांचे सान्निध्य आपल्याला मिळाले ही परमेश्वराची कृपाच आहे. त्यांच्याकडे अलौकिक शक्ती असली तरीही त्यांनी माणसांना जवळ केले’, या शब्दात सरसंघचालकांनी केलेले एका व्यक्तीमत्वाचे वर्णन आज केंद्र सरकारने त्यांना जाहीर केलेल्या पद्म पुरस्काराने सार्थ ठरवले आहे.
वयाच्या सातव्या वर्षी संघाच्या संस्काराची रुजलेली बीजं, तिथे गोळवलकर गुरुजींच्या सान्निध्यात बहरलेले व्यक्तिमत्त्व, आठव्या वर्गात असताना रामकृष्ण मठात जाणे झाले आणि अध्यात्म आणि सामाजिक संस्कार बालवयातच मिळालेत. संघाच्या सामाजिक कार्याच्या दिशेने प्रवास करायचा की अध्यात्माची कास धरायची, ही द्विधा संघाच्याच विचारसरणीने कार्य करण्याच्या ठाम निर्णयाने सुटली. दरम्यान, समाजातील प्रभाव आणि लोकप्रियता बघून त्यांना राजकारणात ओढण्याचाही बराच प्रयत्न झाला. परंतु, सत्तेचा ध्यास धरायचा नाही आणि सत्तेत राहण्यासाठी राजकारण करायचे नाही, या स्वतःच्या भूमिकेवर ते नि:संदिग्धपणे ठाम राहिले आणि पुढचा मार्ग अधिक सुकर होत गेला.
मिळालेले आयुष्य हे परमेश्वराची कृपा आहे. आपण परमेश्वराने दिलेले बोनस जीवन जगत आहोत, हे सांगताना डॉक्टर निर्विकार असतात, तेव्हा त्यांच्या सामाजिक कार्याला लाभलेल्या वैचारिक व अध्यात्मिक अधिष्ठानाचाही आपसूकच परिचय घडतो.
बाळासाहेब ठाकरे यांच्यावर उपचार करून मुंबईहून विमानतळावर जाताना झालेल्या भीषण अपघाताची आठवण फार जुनी नाही. त्या अपघातातून सुखरूप बचावणे ही परमेश्वराचीच कृपा. मध्यंतरीच्या एका प्रसंगात दृष्टी बाधित होण्याची घटनाही त्यांच्या शेकडो चाहत्यांना विचलित करून गेली होती. पण, काही दिवसांतच त्यांनी स्वतःला सावरलं आणि जनसेवेसाठी ते कार्यप्रवण झालेत.
आज केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पद्म पुरस्कारांच्या यादीत डॉ. विलास डांगरे यांचा समावेश असणे हा नागपूरकराचा, होमिओपॅथी उपचार पध्दतीबाबत जनमानसात विश्वास निर्माण करण्यासाठी त्यांनी आजवर केलेल्या कार्याचा आणि त्यांच्या अगणित चाहत्यांचाही गौरव आहे.
सुनील कुहीकर, नागपूर