
गोंदिया – गोंदिया जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करण्यासाठी आधी शासनाने 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली होती. पण, ही मुदत संपल्याने बरेच शेतकरी नोंदणीपासून वंचित असल्याने शासनाने नोंदणी करण्यास 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. या संदर्भातील अन्न नागरी पुरवठा विभागाचे अप्पर सचिव मिलिंद शेणॉय यांनी आदेश काढले आहेत. शासकीय धान खरेदी केंद्रावर हमीभावाने धानाची विक्री करण्यासाठी शासनाने मागील दोन वर्षांपासून एनईएमएल या पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करणे अनिवार्य केले आहे. नोंदणी न करणाऱ्या शेतकऱ्यांना शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करता येत नाही. मात्र, यंदा शासनाने धान खरेदी केंद्रांना नवीन अटी, शर्ती लागू केल्या. त्यामुळे संस्थांनी धान खरेदीवर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे धान खरेदीला दिवाळीपूर्वी सुरुवात झाली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना धानाची विक्री करण्यापासून वंचित राहावे लागले होते. तर हजारो शेतकरी नोंदणीपासून वंचित होते. जिल्ह्यात दरवर्षी अडीच लाखावर शेतकरी शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करतात. पण, यंदा 30 नोव्हेंबरपर्यंत 76 हजार 156 शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. त्यामुळे हजारो शेतकरी नोंदणीपासून वंचित असल्याने नोंदणीला मुदतवाढ देण्याची मागणी केली जात होती. याचीच दखल घेत शासनाने आता 31 डिसेंबरपर्यंत ऑनलाइन नोंदणीसाठी मुदतवाढ दिली आहे. खरीप हंगामातील धान खरेदीला दिवाळीनंतर सुरुवात झाली. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या 34 धान खरेदी केंद्रांवरून आतापर्यंत 1 लाख 51 हजार क्विंटल धान खरेदी करण्यात आली आहे. तर सोमवारपासून पुन्हा धान खरेदी केंद्रांची संख्या वाढण्याची शक्यता असून धान खरेदीला वेग येण्याची शक्यता आहे.