
नागपूर – विदर्भाला सर्वच क्षेत्रांमध्ये आत्मनिर्भर करण्यासाठी औद्योगिक विकास महत्त्वाचा आहे. याच हेतूने विदर्भातील औद्योगिक क्षमता विकसित करणे, तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, स्टार्टअप्सला चालना देणे, विक्रेता विकासाच्या संधी उपलब्ध करून देणे, नवीन तंत्रज्ञानाचा परिचय करून देणे, रोजगारांसाठी नवकल्पना आणि पोषक वातावरण निर्माण करणे आणि यशस्वी उद्योजकांच्या यशोगाथा प्रदर्शित करण्यासाठी नागपूर मध्ये येत्या 27 ते 29 जानेवारी दरम्यान खासदार औद्योगिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती नागपूरचे खासदार आणि केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकार परिषदेत दिली. असोसिएशन ऑफ इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट (एड) तर्फे आयोजित “खासदार औद्योगिक महोत्सव” 27 जानेवारी ते 29 जानेवारी 2024 या कालावधीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या, जमनालाल बजाज प्रशासकीय इमारत परिसर, अमरावती रोड, नागपूर येथे होणार आहे. खासदार औद्योगिक महोत्सवाच्या अंतर्गत नागपुरात प्रथमच हे आयोजन करण्यात आले आहे. विदर्भातील सर्वात मोठा इंडस्ट्रियल एक्स्पो, बिझनेस आणि इन्व्हेस्टमेंट कॉन्क्लेव्ह या माध्यमातून बघायला मिळणार आहे.