

जयपूर (Jaipur), 18 ऑगस्ट अवयवदान म्हणजे एक आध्यात्मिक कृती आणि मानवी स्वभावाच्या नैतिकतेचे सर्वोच्च उदाहरण आहे, असे उपराष्ट्रपती जगदीप धनखड (Vice President Jagdeep Dhankhad) यांनी सांगितले. अवयवदान शारीरिक औदार्यापलीकडे जात असून करुणा आणि निःस्वार्थ वृत्तीची सखोल मूल्ये प्रतिबिंबित करते, असे ते म्हणाले.
जयपूरच्या जैन सोशल ग्रुप सेंट्रल संस्थान आणि दधिची देह दान समिती दिल्ली यांनी जयपूर इथे अवयवदात्यांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्यासाठी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपराष्ट्रपतींनी नागरिकांना अवयवदानासाठी सामाजिक भान ठेवून प्रयत्न करण्याचे आणि मानवतेची सेवा करण्याच्या उदात्त परंपरेशी सुसंगत असलेल्या एका मोहिमेत याचे रुपांतर करण्याचे आवाहन केले.
जागतिक अवयवदान दिवसाची “कोणाच्या चेहऱ्यावरील आजच्या स्मितहास्याचे कारण बना” ही संकल्पना अधोरेखित करत धनखड यांनी अवयवदानाच्या उदात्त कार्यासोबत वैयक्तिक आणि कौटुंबिक बांधिलकी निर्माण करण्याची प्रेरणा दिली.
अवयवदानाच्या वाढत्या बाजारीकरणाच्या विषाणूबाबत चिंता व्यक्त करत धनखड यांनी अवयवदान हे आर्थिक फायद्याचा विचार करून नव्हे तर समाजाचा विचार करून झाले पाहिजे, यावर भर दिला. वैद्यकीय व्यवसाय म्हणजे एक देवत्वाचा व्यवसाय असल्याचे सांगत आणि कोविड महामारीच्या काळात आरोग्य योद्ध्यांनी केलेल्या निःस्वार्थ सेवेला अधोरेखित करत त्यांनी वैद्यकीय व्यवसायातील काही जण अवयवदानाच्या उदात्त स्वरुपाला कमकुवत करत असल्याचे नमूद केले. काही कावेबाज आणि धूर्त घटकांच्या व्यावसायिक फायद्यासाठी अवयवदानाचे क्षेत्र समाजातील असुरक्षित लोकांच्या शोषणाचे क्षेत्र बनू नये यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील, असे त्यांनी सांगितले.
निःस्वार्थ सेवा आणि त्याग यांच्या अनेक उदाहरणांचे दाखले असलेल्या भारताच्या समृद्ध सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचे महत्त्व सांगत त्यांनी प्रत्येकाला ज्ञान आणि मार्गदर्शनाचे भांडार म्हणून काम करत असलेले आपले प्राचीन ग्रंथ आणि वेद यातील विद्वत्तेचा अंगिकार करण्याचे आवाहन केले.
राजकीय मतभेद म्हणजे लोकशाहीचे वैशिष्टय असल्याचे महत्त्व अधोरेखित करत धनखड यांनी हे मतभेद कधीही राष्ट्रहिताला झाकोळून टाकणार नाही याची खबरदारी घेण्याकडे लक्ष वेधले. यापूर्वीच्या काळात आपल्या लोकशाहीला निर्माण झालेल्या धोक्यांबाबत, विशेषतः आणीबाणीबाबत युवा पिढीला शिक्षित करण्यावर आणि अशा घटना टाळण्यासाठी दक्ष राहण्यावर त्यांनी भर दिला.