
नागपूर -पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेत आपल्या देशाची मान जगभरात उंच करत आहेत. माझा सन्मान म्हणजे १४० कोटी भारतीयांचा सन्मान असं पंतप्रधानांनी म्हटले आहे. पंतप्रधानांच्या भीतीपोटी आपल्या मुलाबाळाची चिंता आहे, म्हणून विरोधक पाटण्यात एकत्र येत आहेत असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
माध्यमांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, शरद पवार यांना सुप्रिया सुळे यांची चिंता आहे, तर उद्धव ठाकरे यांना आदित्य याची चिंता आहे म्हणूनच ते एकत्र आले. मात्र, विरोधकांनी कितीही एकत्र मोट बांधली तरी देशातील जनता यांना चांगली ओळखून आहे. कितीही वज्रमुठ बांधली तरी २०२४ मध्ये संपूर्ण एनडीए ४०० प्लस होणारच इतकी पंतप्रधानांची किमया आहे. आम्ही केलेले काळे धंदे उघडकीस येणार म्हणून यांना चिंता आहे. ही विरोधकांची वज्रमुठ सैल करण्याचं काम १४० कोटी जनता करणार. मोदी नकोच ते असले तर आपण शून्य होतो. म्हणून भितीपोटी हे लोक एकत्र येत आहेत. उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे यांना महाराष्ट्र सांभाळता येत नाही. ते पाटण्यात जाऊन काय करणार असा सवालही त्यांनी केला. बीएमसी मध्ये कोवीडच्या काळात किती भ्रष्टाचार करुन ठेवला हे माहित आहे. महाराष्ट्राची जनता यांना साथ देणार नाही कारण हे बोलघेवडे आहेत.
अजित पवार यांनी व्यक्त केलेली भावना राष्ट्रवादीचा अंतर्गत प्रश्न आहे.
शरद पवार यांना अजित पवार आणि छगन भुजबळ कार्याध्यक्ष नेमायचं होतं. पण त्यांनी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांना नेमले. यावरुनच त्यांच्यात काही ऑलवेल नाही हे दिसले. राष्ट्रवादीला ओबीसींचे काही देणं घेणं नाही. पुन्हा एकदा राष्ट्रवादीत महानाट्य सुरु झाले असून आता त्याचा शेवट शरद पवारच करतील.
मोठ्या प्रमाणात भाजपात पक्ष प्रवेश होत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चंद्रपूर प्रवासात डॉ अशोक जिवतोडे,रमेश राजूरकर पक्षात येत आहेत. पुढच्या काळात आणखी मोठे पक्ष प्रवेश होणार आहेत. दरम्यान,कॉंग्रेस हे डुबतं जहाज आहे. या डुबत्या जहाजात कोणी बसत नाही. कॉंग्रेसच्या नेतृत्त्वाला कोणी मानत नाही.
– नाना पटोले यांना तरी कोण मानतात. नाना पटोले यांनी चंद्रपूरच्या अध्यक्षाला हटवलं आणि कॉंग्रेसच्या केंद्रीय नेतृत्त्वाने त्या अध्यक्षाला परत घेतलं अशी टीका केली.