हिट अँड रन कायद्याचा विरोध ; महामार्ग रोखला

0

रस्त्यावर ऑइल ओतले, टायर जाळून थांबवल्या गाड्या

अमोल खोडे @ अमरावती : केंद्र सरकारच्या नव्या अपघात विषयक कायद्याच्या विरोधात पेटून उठलेल्या ट्रकचालकांसह अन्य खाजगी वाहन चालकांनी सोमवारी (ता.१) अमरावती-नागपूर महामार्गावर चक्काजाम आंदोलन केले. अमरावती शहरासह विविध ठिकाणीहि एकाच दिवशी हे आंदोलन करण्यात आले. या शृंखलेत सोमवारी ट्रक चालकांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वर रस्त्यावर ऑइल ओतून व टायर जाळून महामार्गावरील दोन्हीकडील वाहतूक रोखून धरली. या चक्काजाम आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावर दोन्हीकडून वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्या होत्या. परिणामी महामार्गावर बराच वेळ वाहतुकीची कोंडी झाली होती.

केंद्र सरकारने हिट अँड रन कायद्यात बदल केला असून आता यापुढे अपघात झाल्यास चार चाकी वाहन चालकास विरोधात थेट कार्यवाही होणार आहे.
या विरोधात देशभरातील ट्रकचालक व अन्य खाजगी वाहन चालक रस्त्यावर उतरले आहेत. अमरावतीमध्ये देखील या आंदोलनाचा परिणाम दिसून आला. सोमवारी सकाळपासूनच ट्रक चालक संघटनेच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर गोळा होऊन चक्काजाम करण्यात आला. या मार्गावर आंदोलकांनी नव्या कायद्याच्या विरोधात टायर जाळून संताप व्यक्त केला. केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणा दिल्या. पोलिसांनी आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. परंतु बराच वेळ आंदोलन सुरू असल्याने या मार्गावर वाहतूक खोळंबली होती. वाहनांच्या लांबाच लांब रांगा लागल्यामुळे इतर वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागला.अमरावती-नागपूर मार्गावर झालेल्या या चक्काजाम आंदोलनात हजारो वाहन चालक सहभागी झाले होते. पोलिसांनी हस्तक्षेप करीत आंदोलकांना रस्त्याच्या बाजूला केले. यानंतर या महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. दरम्यान दुसरीकडे ट्रक असोसिएशन द्वारा जिल्हाधिका कार्यालयावर दुचाकीद्वारे मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना मागण्याची निवेदन दिले. सरकारने आणलेला नवा कायदा रद्द करण्यात यावा, अशी मागणी केली. यावेळी मिराज खान पठाण, पुरुषोत्तम बागडी, शेख हबीब, मधुकर धनगर, गुलाम मुस्तफा, नईम खान, मोहम्मद जामीर, संतोष फरताडे, सय्यद जावेद, अयुब खान, सुनील यादव, अब्दुल नासीब, आताऊल्ला खान, सलीम खान,अब्दुल जाकिर, संतोष चुटे रेहान शेख सह ट्रकचालक व अन्य खाजगी वाहन चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.