Operation Sindoor : भारताला मोठे यश, लष्कर ए तोयबाच्या दोन कमांडरचा खात्मा

0

Operation Sindoor :भारताने पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर ऑपरेशन सिंदूर केले. मुजफ्फराबाद ते सियालकोट पर्यंतच्या ९ ठिकाणी लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदच्या तळांना धक्का बसला.

जम्मू-कश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आता भारताने चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’ द्वारे पाकिस्तानातील ४ आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ५ दहशतवादी तळ उद्धवस्त केले. भारतीय सैन्याने मुजफ्फराबाद, बहावलपूर, कोटली, चाक अमरू, गुलपूर, भिंबर, मुरीदके आणि सियालकोट या ठिकाणी एकापाठोपाठ नऊ ठिकाणी हल्ले केले. या एअर स्ट्राईकमध्ये पाकिस्तानातील दोन मोठ्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारताला यश आले आहे.

दोन दहशतवादी ठार

मिळालेल्या माहितीनुसार, भारताने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये लष्कर ए तोयबाचे दोन कमांडर ठार झाले आहेत. मुदस्सार आणि हाफीज अब्दुल मलिक अशी ठार झालेल्या दोन दहशतवाद्यांची नावे आहेत. त्यासोबतच या हल्ल्यात लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदच्या या दोन्हीही दहशतवादी मुख्यालयांवर कारवाई करण्यात आली. या हल्ल्यात १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले, अशी माहिती समोर येत आहे. तसेच मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान भारतानं पाकिस्तानच्या हद्दीतील एकूण ९ ठिकाणी एअर स्ट्राईक केला. यात पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे मोठे तळ उद्ध्वस्त झाले आहेत. मध्यरात्री दीडच्या सुमारास भारताने हा हवाई हल्ला केला. त्यात भारतानं कोणत्याही नागरी वस्तीवर हल्ला केलेला नाही. फक्त दहशतवादी तळांनाच लक्ष्य केले. यामुळे भारतानं जगासमोर आदर्श ठेवल्याच्या भावना व्यक्त होत आहेत.

कुठल्या 9 ठिकाणांवर एअर स्ट्राईक?

१) बहावलपूर २) मुरिदके ३) गुलपूर ४) भीमबर ५) चक अमरु ६) बाग ७) कोटली ८) सियालकोट ९) मुजफ्फराबाद

मध्यरात्रीच पाकड्यांची झोप उडाली

दरम्यान ऑपरेशन सिंदूरमुळे मध्यरात्रीच पाकड्यांची झोप उडाली. भारताच्या या हवाई स्ट्राईकमुळे पंजाबमधील लाहोर ते पाकव्याप्त काश्मीरपर्यंत हाहाकार माजला. भारतीय मिसाईलच्या धमाक्यामुळे इस्लामाबादपर्यंत हादरे बसले. भारतीय वायुसेनेने हे हल्ले केले. सूत्रांच्या माहितीनुसार, राफेल आणि सुखोई यांनी पाकिस्तानमधील दहशतवादी ठिकाणांवर बॉम्ब टाकले. या ऑपरेशनची जबाबदारी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्याकडे होती. त्यांनीच या हल्ल्याला अंतिम रूप दिले. या ऑपरेशनवर रात्रभर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बारीक लक्ष होते. अजित डोभाल हे त्यांना या ऑपरेशनची बारीकसारीक माहिती देत होते. या हल्ल्यात केवळ दहशतवादी ठिकाणांवरच हल्ले करण्यात आले.