‘झकास’ वर केवळ अनिल कपूरचा हक्क!

0

नवी दिल्ली-अभिनेते अनिल कपूर यांना न्यायालयाने मोठा दिलासा दिलाय. अनिल कपूर यांचा प्रसिद्ध डायलॉग ‘झकास’सह अशा अनेक गोष्टी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाशी निगडित असून त्यांच्या संमतीशिवाय इतर कोणीही त्यांचा व्यावसायिक वापर करू शकणार नाही, असा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे. अनिल कपूर यांनी सादर केलेल्या याचिकेवर सुनावणीनंतर न्या प्रतिभा एम सिंह यांनी हा निर्णय दिलाय. (Relief for Actor Anil Kapoor)
अनिल कपूरची बाजू मांडणारे वकील प्रवीण आनंद यांच्या दाव्यानुसार, अनेक वेबसाइट्स आणि प्लॅटफॉर्म कपूर यांच्या व्यक्तिमत्वाशी निगडित गोष्टींचा गैरवापर करताना दिसत आहेत. वाणिज्य वापरासाठी त्याचा अनधिकृत वापर केला जात आहे. याशिवाय त्यांची प्रतिमा अपमानास्पद पद्धतीने मॉर्फ केली जात आहे. त्याचप्रमाणे बनावट ऑटोग्राफ आणि “झाकास” शब्द वापरून जीआयएफ फाईल्स आणि स्टिकर्ससह त्यांचे फोटो विकले जात असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने आपल्या आदेशात नमूद केलेय की, कोणतीही वेबसाइट किंवा अन्य प्लॅटफॉर्म अभिनेता अनिल कपूरचं नाव, प्रतिमा, आवाज आणि त्याच्या प्रसिद्ध कॅचफ्रेज “झाकास” यासह व्यावसायिक फायद्यासाठी वापरू शकत नाही.
“झकास” ची अशीही माहिती
वकीलांनी न्यायालयात सांगितले की,

” हा मराठी भाषेतील शब्द आहे. त्याचा अर्थ सुंदर असा होतो. अनिल कपूर यांनी सर्वप्रथम १९८५ मध्ये आलेल्या ‘युद्ध’ चित्रपटात हा शब्द वापरला होता. हा शब्द बोलण्याच्या अनोख्या पद्धतीमुळे तो आता अनिल कपूर यांच्या व्यक्तिमत्वाचा भाग बनला आहे.