ऑनलाईन धर्मांतरणाच्या आरोपीचे पाकिस्तानशी संबंध

0

गाझियाबाद, 14 जून : ऑनलाइन गेमिंगद्वारे धर्मांतर प्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी शाहनवाज उर्फ बद्दोचे पाकिस्तानशी संबंध असल्याचे पुरावे सापडले आहेत. त्याचे कॉल डिटेल्स तपासल्यानंतर ही सर्व माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्याच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायदा (एनएसए)लागू करण्याची तयारी सुरू झाली आहे. बद्दोची चौकशी करणाऱ्या उत्तरप्रदेशातील गाझियाबाद पोलिसांनी ही माहिती दिली.

याबाबत गाझियाबाद शहर डीसीपी निपुण अग्रवाल यांनी सांगितले की, शाहनवाज उर्फ बद्दोच्या कॉल डिटेल्समध्ये मोठा खुलासा झाला आहे. त्याचे 30 पाकिस्तानी नंबर्सशी संभाषण झाल्याचे उघड झाले आहे. याशिवाय बद्दोकडून 2 मेल आयडीही मिळाले असून त्यापैकी एक पाकिस्तानचा आहे. बद्दोच्या पीओकेमध्ये बसलेल्या एका व्यक्तीकडून पोलिसांना चॅटही मिळाला आहे. याशिवाय लाहोरच्या वाहतूक निरीक्षकाचे ओळखपत्रही जप्त करण्यात आले आहे.

गाझियाबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली , जिथे एक मुलगा दिवसातून 5 वेळा जिमच्या बहाण्याने नमाज अदा करण्यासाठी मशिदीत जात असे. यानंतर हे प्रकरण पोलिसांकडे गेल्यावर एका व्यक्तीने ऑनलाइन गेमिंगमुळे त्याचे ब्रेनवॉश केल्याचे आढळून आले. या प्रकरणाचे तार इतर ठिकाणांहूनही जूडू लागले आणि धर्मांतराचे रॅकेट उघड झाले. या संपूर्ण रॅकेटचा सूत्रधार गेल्या अनेक दिवसांपासून उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र पोलिसांच्या डोळ्यात धूळफेक करत होता. अखेर गाझियाबाद पोलिसांच्या पथकाने आरोपी शाहनवाज मकसूद खान उर्फ बद्दो याला महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातून अटक करून ट्रान्झिट रिमांडवर गाझियाबादला नेले.गाझियाबादला आणल्यानंतर आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले, तेथून त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. न्यायालयात हजर करण्यापूर्वी पोलिसांनी बद्दोची काही काळ चौकशी केली. महाराष्ट्रातील रायगड येथून बद्दोला अटक केल्यानंतर ठाणे न्यायालयाने त्याला 72 तासांची ट्रान्झिट रिमांड मंजूर केली होती.