

डॉ. गिरीश गांधी गौरवार्थ रात्रकालीन एकांकिका स्पर्धेचे सादर होणार 9 एकांकिका
अखिल भारतीय नाट्यपरिषदेचे विभागीय स्तरावरील आयोजन
नागपूर (NAGPUR), 23 एप्रिल
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे 100 वे विभागीय मराठी नाट्यसंमेलन 24 ते 27 या दरम्यान नागपूर येथे आयोजित करण्यात आले आहे. यानिमित्त गुरुवार, 24 रोजी पूर्वरंगात डॉ. गिरीश गांधी गौरवार्थ रात्रकालीन एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यात मुंबई, अंबरनाथ, अमरावती, ठाणे आणि नागपूरच्या 9 एकांकिका सादर होणार आहेत.
रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात गुरुवार, 24 रोजी संध्याकाळी 6 वाजता महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम हेमंत पाटील यांच्या हस्ते एकांकिका स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, नागपूर शाखेचे अध्यक्ष अजय पाटील राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून झाडीपट्टी कलावंत पद्मश्री डॉ. परशुराम खुणे राहणार आहेत.
रात्रभर प्रो इव्हेंटिस मुंबईचे ‘चानू’, चंद्रस्था थिएटर्स नागपूरचे ‘डार्क एज’, इथ इति नाट्यकला प्रतिष्ठान अमरावतीचे ‘मधुमोह’, बहुजन रंगभूमी नागपूरचे ‘गटार’, एम स्टुडिओ नागपूरचे ‘लेखिका’, तांडव क्रिएशन नागपूरचे ‘दृष्टांत’, थोरवी थिएटर्स नागपूरचे ‘बाप’, नाण्य परिवार ठाणेचे ‘इथे चूल कोणी मोडू नये’ आणि निओकास्ट थिएटर नागपूरचे ‘द डील’ या एकांकिकांचे सादरीकरण होणार आहे. एकांकिकांचे परीक्षण अॅड. शैलेश गोजमगुंडे, शेखर बेंद्रे आणि काजल राऊत करतील.
स्पर्धेचा समारोप शुक्रवार, 25 रोजी सकाळी 6 वाजता बक्षीस वितरणाने होणार असून या कार्यक्रमाला ‘चला हवा येऊ द्या’ फेम भारत गणेशपुरे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. एकांकिका स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम बक्षीस 51 हजार, द्वितीय 31 हजार, तर तृतीय बक्षीस 21 हजाराची भरघोस बक्षिसे दिली जाणार असून अभिनय, दिग्दर्शक, नेपथ्य, प्रकाशयोजना, पार्श्वसंगीत, लेखक अशी वैयक्तिक बक्षिसे देखील देण्यात येणार आहेत.
नागपूरकरांनी या नाट्यसंमेलनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून आनंद घ्यावा, असे आवाहन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे नरेश गडेकर व विभागीय अध्यक्ष अजय पाटील व इतर पदाधिका-यांनी केले आहे.