

कार्यक्रमाचे उद्घाटन प्रबोधनकार विजया मारोतकर यांच्या हस्ते झाले. त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना विशेषतः विद्यार्थिनींना समाजात वावरताना घ्यावयाची दक्षता आणि काळजी यांचे धडे दिले. त्यांचा प्रबोधनपर कार्यक्रम ‘पोरी जरा जपून’ प्रसिद्ध आहे.
त्यांच्यासमवेत वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील डफ आणि ICTC ग्रामीण रुग्णालय, कळमेश्वर येथील समुपदेशक मा. अर्चना चंदनखेडे यांनी देखील विद्यार्थ्यांना एड्स प्रतिबंधाशी संबंधित घ्यावयाची खबरदारी आणि महत्वाचे मुद्दे समजावून सांगितले आणि त्यांच्या शंकांचे निरसन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षपदाची धुरा मुख्याध्यापक मा. सुरेंद्र चांभारे यांनी सांभाळली. यावेळी HER फाऊंडेशनच्या अध्यक्षा ॲड. भूमिता सावरकर यांनीही विद्यार्थ्यांना एड्स जनजागृतीच्या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना एड्सच्या कारणांपासून प्रतिबंधात्मक उपायांपर्यंत सर्व माहिती देण्यात आली. तसेच, समाजात या विषयावर सकारात्मक चर्चा करण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
HER फाऊंडेशनच्या वतीने एक प्रेरणादायी उपक्रम:
या कार्यक्रमाच्या माध्यमातून एड्सविषयी चुकीच्या समजुती दूर करण्यात आणि जनजागृतीसाठी प्रभावी संवाद साधण्यात यश मिळाले. विद्यार्थ्यांनीही या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला.
हा उपक्रम केवळ जागरूकतेसाठी नव्हे तर समाजात आरोग्य व शिक्षण याबाबत सकारात्मक बदल घडविण्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.