

नागपूर, (Nagpur) 13 ऑक्टोबर
माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जी अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त विदर्भ साहित्य संघात मंगळवार, 15 ऑक्टोबर रोजी ‘वाचन प्रेरणा दिना’चे दोन कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.
सीताबर्डी येथील वि. सा. संघाच्या अमेय दालनात वि. सा संघ आणि महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दुपारी 4 वाजता ‘कथा अभिवाचन’ होईल. यात विवेक अलोणी, विनय मोडक, कल्याणी गोखले यांचा सहभाग राहणार आहे.
दुसरा कार्यक्रम सायंकाळी 6 वाजता वि. सा. संघ, जिल्हाधिकारी कार्यालय आणि भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. यात ‘विदर्भ, माझ्या मातीतील लेखक आणि माझा वाचन प्रवास’ या विषयावर मुंबईचे प्रसिद्ध व्याख्याते प्रा. अविनाश कोल्हे बोलणार आहेत.
या दोन्ही कार्यक्रमांचा साहित्य रसिकांनी आस्वाद घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.